नगर : कारवाईच्या ससेमिर्‍यामुळे दूध संघ होणार बंद ; नेवासा तालुक्यात पसरली अस्वस्थता | पुढारी

नगर : कारवाईच्या ससेमिर्‍यामुळे दूध संघ होणार बंद ; नेवासा तालुक्यात पसरली अस्वस्थता

सोनईः पुढारी वृत्तसेवा :  नेवासा तालुका दूध संघावर राजकीय हेतूने सुरू असलेल्या एकामागोमागच्या कारवायांमुळे नेवासा तालुका दूध संघ अखेर बंद करण्याचा निर्णय दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. नेवासा तालुक्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांना कुठे दूध घालायचे असा ज्यावेळेस प्रश्न होता, त्यावेळेस आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची निर्मिती झाली. मोठे राजकीय वजन वापरून वेळोवेळी पाठवपुरावा करून गडाख यांनी परवानगी मिळवली.

72 गावांत चिलिंग मशीन
संघामार्फत तालुक्यातील सुमारे 72 गावात दूध थंड करण्यासाठी चिलिंग मशीन अनुदान देऊन वाटप केले होते. शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळतानाच अर्थकारणाला गती मिळाली होती.

शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक शिबिरे
घोडेगाव येथे जनावरांच्या बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांना पशुपालनास प्रोत्साहन देणारे व मार्गदर्शन करणारे विविध शिबिरे राबवून संघाच्या मार्फत शेतकर्‍यांना मदत करण्यात आली होती. नेवासा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक पत देण्याचे काम नेवासा दूध संघाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.

दूधसंघाशी करारातून उच्चांकी दर
महानंद, आरे तसेच गुजरातमधील समूल या दूध संघाशी करार करून दूध उत्पादकांना वाढीव पैसे मिळवून दिले. तीरमली, डवरी गोसावी, वाघवाले, या हातावर पोट असलेल्यांना व अल्पभूधारक शेतकरी यांना दूध संघामार्फत बिगर व्याजी 4 ते 5 कोटी रुपये देऊन गाई, म्हशी खरेदी करण्यास आगाऊ रक्कम वाटप करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दूध संघाचे पाठबळ मिळून आर्थिक पत निर्माण झाली.

दूध संघ बंदमुळे नुकसान
नेवासा तालुक्यातील आर्थिक प्रगतीत संघाचे मोठे योगदान आहे. परंतु, काही दिवसांपासून दूध संघामागे कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. त्यामुळे गडाख यांच्या ताब्यातील नेवासा तालुका दूध संघ बंद करण्यात आला असून संघाचे तसेच तालुक्यातील हजारो दूध उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संघाची वीज तोडू नये असा न्यायलयाचा आदेश असताना देखील वीज कनेक्शन कट केले आहे. आता हक्काचा दूध संघ बंद होणार असल्याने दूध उत्पादक व कामगार यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्मचारी बेरोजगार; दुधाचं करायचंं काय?
50 कर्मचारी बेरोजगार होणार असून त्यांच्या कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. 20 ते 25 हजार लिटर दूध कुठे घालायचे हा प्रश्न दूध उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.फ

राजकीय सुडातून मुळा एज्युकेशनही बंद ?

आमदार गडाख हे चक्रव्यूहात अडकले असल्याचे दिसून येत आहे. संघ बंद झाला असून मुळा शैक्षणिक संस्थेची तक्रार शासनाकडे चालू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधकानीं लावलेले चक्रव्यूह गडाख यांना तोडता आले नाही. आगामी काळात गडाख हे मोठ्या अडचणीत सापडण्याची चर्चा होत आहे.

कारखान्याच्याही तक्रारी, सूतगिरणी लालफितीत

मुळा साखर कारखान्याच्या विविध तक्रारी आहेत. सूतगिरणी प्रकल्प लालफितीत अडकवून ठेवला. जर दूध संघासह दुसर्‍या संस्था अडचणीत आल्या तर त्याचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनता, व्यापारी पेठेवर बसणार आहे. यामुळे अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

तरीही गडाख मदतीसाठी पुढेच…!

राजकीय सूडबुद्धीने अनेक कारवाया झाल्यामुळे आ. शंकरराव गडाख यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला संघ बंद करताना मनाला मोठ्या वेदना होत आहे. संघाला गावागावात संकलित होऊन उत्पादकांचे पाठविण्यात येणारे दूध यांची व्यवस्था करून देण्यासाठी, संघाचे कर्मचारी यांना पुन्हा इतरत्र सेवेत घेऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.गडाख संकट काळातही प्रयत्नशील आहे, असे संघाचे अध्यक्ष गणपत चव्हाण म्हणाले.

Back to top button