पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात रात्री जोरदार पाऊस | पुढारी

पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात रात्री जोरदार पाऊस

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावच्या परिसरात सोमवारी (दि. ६) रात्रीच्या दरम्यान अचानक वादळ वाऱ्यासह सुरु झालेला जोरदार पाऊस दोन ते अडीच तास राहिला. त्यानंतर मात्र अधूनमधून रात्रभर रिमझिम पाऊस पहाटेपर्यंत सुरु होता. अचानकन झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात ऐरण लावून ठेवलेला कांदा, ज्वारीचा कडबा भिजला तर उन्हाळी बाजरी पिकाला फटका बसला आणि वादळ वाऱ्याने आंब्याचा मोहोर देखील गळाल्याने नुकसान झालेले आहे.

तीन ते चार दिवसापूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा काढून ऐरण लावून शेतात ठेवला होता. ज्वारी देखील कणसासह तर काही ठिकाणी कडबा भिजल्याने नुकसान झाले. विशेष करून पाईट जवळच्या कोमलवाडी, सावंतवाडीतील वादळाने हापूस आंब्याच्या बागातील झाडाला आलेला मोहोर गळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे आंबा उत्पादक शेतकरी रामदास खेंगले, भरत खेंगले यांनी सांगितले.

पाईट, आंबोली, देशमुखवाडी, अहिरे, पाळू, करंजवहिरे, वहागांव, अखतुली, वांद्रा, रौधळवाडी, देवतोरणे, तळवडे आदी गावच्या परिसरात पाऊस झाला. रात्रीच्या दरम्यान सुरु झालेला पाऊस दोन ते अडीच तास सुरूच राहिला. त्यानंतर मात्र पाऊस कमी होऊन पहाटेपर्यंत रिमझिम सुरु होता. पावसामुळे काही वेळा लाईट गेली आणि पुन्हा आली. मंगळवारी (दि. ७) देखील ढगाळ हवामान असून पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

Back to top button