कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान; पोलिस निरीक्षक गायकवाड, गडकरी यांच्यावर जबाबदारी | पुढारी

कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान; पोलिस निरीक्षक गायकवाड, गडकरी यांच्यावर जबाबदारी

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : पारनेर व सुपा दोन्ही पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्यासमोर कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून गुन्हेगारी प्रवृत्तींवर धाक निर्माण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पारनेर पोलिस निरीक्षक पदी संभाजी गायकवाड व सुपा येथे ज्योती गडकरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संभाजी गायकवाड हे जामखेड पोलिस स्टेशनला पोलीस निरीक्षक राहिले असून त्यांनी तिथे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालत चोर्‍या, दरोडे लुटमार आदी गुन्ह्यांच्या उकल करत आरोपींना जेरबंद केले. गुन्हेगारांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

पारनेर व सुपा पोलिस स्टेशनची लक्तरे गुन्हेगारांनी अनेक दिवसापासून वेशीवर टांगली होती मात्र आता या अधिकार्‍यांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी नागरिकांची अपेक्षा वाढली आहे. ज्योती गडकरी ह्या नगर येथेच तोफखाना पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून राहिल्या होत्या. त्यांची तेथे उत्कृष्ट कारकीर्द राहिली आहे. महिला सिंघम अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्याआधी आर्थिक गुन्हे शाखेचा कारभार त्यांनी पाहिला आहे.

निरीक्षक गडकरी यांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चांगल्या पद्धतीने कारभार केलेला आहे. नगर अर्बन व शहर सहकारी बँक घोटाळा प्रकरणांमध्ये त्यांनी विशेष तपास करून आरोपींना जेरबंद करण्यामध्ये योगदान दिले आहे. पारनेर तालुक्यातील दोन्ही पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असून, गुन्हेगारांवर वचक व धाक आपल्या कृतीतून निर्माण करावा लागणार आहे.

गुन्हेगारी कृत्य खपवून घेणार नाही ः गायकवाड
पोलिस व नागरिक मित्रत्वाचे संबंध असले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करू. जास्तीत जास्त पोलिसिंग कसे राबवता येईल, याला प्राधान्य देण्यात येईल तर हे करत असताना कोणत्याही गुन्हेगाराचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे काम करू, अशी ग्वाही पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

गुन्हेगारी प्रवृत्तींची गय नाही ः गडकरी
कायदा आणि सुव्यवस्था अभेद्य राखण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल व नागरिकांना सुरक्षितता वाटेल. औद्योगिक वसाहत व ग्रामीण भागातील गावे पोलिस स्टेशनला जोडले गेलेले आहेत. दोन्हींचाही समतोल राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. यासाठी कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तींची गय केली जाणार नाही, असे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या.

Back to top button