Indore Test : कांगारूंना जिंकण्यासाठी 76 धावांची गरज, टीम इंडियाची हाराकिरी | पुढारी

Indore Test : कांगारूंना जिंकण्यासाठी 76 धावांची गरज, टीम इंडियाची हाराकिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदूर कसोटीच्या दुस-या दिवशी भारतीय संघाने आपल्या दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपुढे पुन्हा एकदा शरणागती पत्करली. कांगारूंच्या पहिल्या डावातील 88 धावांच्या आघाडी मोडून काढता-काढता रोहित सेनेची अक्षरश: भांबेरी उडाली. नॅथन लायनचे 8 बळी, तर स्टार्क आणि कुहमेनच्या 1-1 विकेटच्या जोरावर स्मिथच्या संघाने टीम इंडियाचा 163 धावांवर ऑलआऊट केला. भारतीय संघाने कशीबशी 75 धावांची आघाडी मिळवली आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून चेतेश्वर पुजाराने (59) एकमेव अर्धशतक झळकावले. शुक्रवारी सामन्याच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाज हे लक्ष्य गाठतील का? की, भारतीय फिरकी कांगारूंना रोखून ऐतिहासिक विजयाची नोंद करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तत्पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांत गुंडाळला. यासह कांगारूंना 88 धावांची आघाडी मिळवण्यात यश आले. त्यानंतर दुस-या डावासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. उपाहारापर्यंत भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 13 धावा केल्या. उपाहारानंतर पहिल्याच षटकात नॅथन लायनने शुभमन गिलला (5) क्लीन बोल्ड करून भारताला पहिला धक्का दिली. तर कर्णधार रोहित शर्माने (12) आपली विकेट स्वस्तात दिली. तो लायनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला.

यानंतर विराट कोहलीही काही खास करू शकला नाही आणि मॅथ्यू कुहनेमनच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. रवींद्र जडेजा सात धावा करून लायनचा बळी ठरला. चेतेश्वर पुजाराने श्रेयस अय्यरसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. श्रेयसनेही 27 चेंडूत 26 धावा फटकावल्या. पण स्टार्कच्या चेंडूवर ख्वाजाकडे झेल देऊन त्याने आपली विकेट गमावली. श्रेयसने पुजारासोबत 35 धावांची भागीदारी केली.

लायनने केएस भरतला (3) क्लीन बोल्ड करून भारताला सहावा धक्का दिला. दरम्यान, पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 35 वे अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे 16 वे अर्धशतक ठरले. अश्विनला बाद करून लायनने 23व्यांदा डावात पाच बळी घेण्याची कियमा केली. यानंतर बळींचा षटकार लगावत पुजाराला स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. पुजारा 142 चेंडूत 59 धावांची लढाऊ खेळी करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. लायनने संघासाठी सुखद शेवट केला. त्याने उमेशला ग्रीनच्या हाती झेलबाद, आणि सिराजचा त्रिफळा उडवून भारताचा डाव 163 धावांवर गारद केला.

लायनने टीम इंडियाला नाचवले

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने दुसऱ्या डावात 64 धावांत आठ गडी बाद केले. त्याची कसोटी कारकिर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2017 मध्ये लायनने बंगळूरमध्ये 50 धावांत आठ विकेट घेतल्या होत्या. तसेच तो आशियाई मैदानात सर्वाधिक बळी घेणारा बिगर आशियाई गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत आशियाई मैदानावर एकूण 130 बळी घेत शेन वॉर्नचा विक्रम मोडला आहे.

रोहित शर्माची रणनीती फसली, पण…

ऑस्ट्रेलियाला 197 धावांत गुंडाळून भारताने पाहुण्यांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखले, पण या धावसंख्येपूर्वीच ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्याची संधी टीम इंडियाला होती. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. दिवसाच्या पहिल्या तासात रोहित शर्माची रणनीती फसली. पण रणनीतीत बदल केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कांगारू फलंदाजांनी भारतापुढे गुडघे टेकले. रोहितने पहिल्या तासात गोलंदाजीत चांगले बदल केले असते तर ऑस्ट्रेलियाला भारतावर 88 धावांची आघाडी मिळवता आली नसती.

रोहितने सामन्याच्या दुस-या दिवसाची सुरुवात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा या जोडीच्या हाती चेंडू देऊन केली. यानंतर त्याने तिसरा गोलंदाज म्हणून अश्विनच्या आधी अक्षर पटेलची निवड केली. चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत या तिन्ही गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवले. पण या गोलंदाजांना विकेट घेता आली नाही. पहिल्या तासात अश्विनला फक्त दोन षटके टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान टीम इंडियाने एकही विकेट न घेता 30 धावा दिल्या.

ड्रिक्स ब्रेकनंतर रोहित शर्माने आपली रणनीती बदलली आणि अश्विनसह उमेश यादवला आक्रमणावर उतरवले. या दोन्ही गोलंदाजांनी अवघ्या 29 मिनिटांत ऑस्ट्रेलियाच्या 6 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दोन्ही गोलंदाजांनी 3-3 विकेट घेतल्या. ड्रिक्स ब्रेकनंतर पहिल्याच षटकात अश्विनने पीटर हँड्सकॉम्पला बाद केल्याने ऑस्ट्रेलियन विकेटच्या पडझडीला सुरुवात झाली. यानंतर उमेश यादवने कॅमेरून ग्रीनला एलबीडब्ल्यू आणि मिचेल स्टार्कचा त्रिफळा उडवून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स कॅरीला एलबीडब्ल्यू केले. उमेश यादवला टॉड मर्फीच्या रूपाने तिसरी विकेट मिळाली. यानंतर अश्विनने नॅथन लायनला क्लीन बोल्ड करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.

अश्विनने कपिल देव यांना मागे टाकले

अश्विनने आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या बाबतीत माजी क्रिकेटर कपिल देव यांना मागे टाकले आहे. इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 3 बळी घेत त्याने ही कामगिरी नोंदवली. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटच्‍या तिन्ही स्‍वरूपांसह अश्‍विनने आतापर्यंत 269 सामन्‍यातील 347 डावांत 689* विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 वेळा सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. तर कपिल यांनी 356 सामन्यांच्या 448 डावात 687 विकेट घेतल्या आहेत. त्यांनी केवळ 2 वेळा सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अश्विनपेक्षा फक्त हरभजन सिंग आणि अनिल कुंबळेने यांच्या खात्यात जास्त विकेट आहेत. हरभजनने 365 सामन्यांच्या 442 डावांमध्ये 707 बळी घेतले आहेत, तर कुंबळे यांनी 401 सामन्यांच्या 499 डावांमध्ये सर्वाधिक 953 विकेट घेतल्या आहेत.

Back to top button