बाजार समिती निवडणुक : जामखेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग | पुढारी

बाजार समिती निवडणुक : जामखेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याने, तालुक्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 20 मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी सांगितले.  बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रत्यक्षात सुरू झाला आहे. दि.1 सप्टेंबर 2022 नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच, सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यावर 8 मार्चपर्यंत आक्षेप व हरकती घेण्यात येणार आहेत. त्यावर 17 मार्चपर्यंत निर्णय घेऊन सुधारित अंतिम मतदारयादी 20 मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जामखेड बाजार समितीचे 18 संचालकाचे कार्यकारी मंडळ आहे. तालुक्यात एकूण 48 विविध कार्यकारी सेवा संस्था असून, सेवा संस्था मतदारसंघात एकूण 615 मतदार आहेत. तर, तालुक्यात 58 ग्रामपंचायती असून, या मतदारसंघात 509 मतदारांचा समावेश आहे. तर व्यापारी/आडते मतदारसंघात 333 मतदार असून, हमाल/मापाडी मतदारसंघात 241 मतदार आहेत.

सेवा संस्था मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत मतदारसंघातून 4, व्यापारी मतदारसंघातून 2, तर हमाल/ मापाडी मतदारसंघातून 1 संचालक निवडून येतो. गेल्या दोन वर्षांपासून या बाजार समितीवर प्रशासक राज आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांमधून निवडून आलेले सदस्य बाजार समिती निवडणुकीसाठी पात्र मतदार आहेत. तालुक्यात सेवा संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षात प्रवेश करून काहींनी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.

मात्र, आता नव्याने निवडून आलेले मतदार कोणत्या पॅनलच्या पारड्यात मत टाकतात, हे आता लवकरच कळणार आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे.

विद्यमान सदस्य आत, माजी बाहेर!
तालुक्यातील रत्नापूर, राजुरी, शिऊर या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्याने सुधारित मतदार यादीत विद्यमान सदस्यांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. तर, माजी सदस्यांना या यादीतून वगळण्यात आल्याचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी सांगितले.

समितीत 18 संचालकांचे कार्यकारी मंडळ
निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता
आ.पवार, आ.शिंदेंकडून इच्छुकांची चाचपणी

 

Back to top button