पुणे : हक्काचा मतदार बाहेर काढा पदाधिकार्‍यांना फडणवीस यांच्या सूचना | पुढारी

पुणे : हक्काचा मतदार बाहेर काढा पदाधिकार्‍यांना फडणवीस यांच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील आपले हक्काचे मतदार आहेत. मात्र, पोटनिवडणुकीसाठी मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. मतदान कमी झाले, तर आपणास त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी, मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करा, हक्काच्या मतदारांना बाहेर काढा,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

भाजप व महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ शुभारंभ लॉन्स येथे मंगळवारी फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक व आजी-माजी पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख आदींची बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांनी निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला. तत्पूर्वी फडणवीस यांच्या हस्ते रासने यांचा निर्धारनामा आणि कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार धनंजय महाडिक, उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘आपले लोक मतदारांच्या घरोघरी जात नाहीत, याची योग्य ती दखल घेतली जाईल. कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांना बोलले पाहिजे. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे, महापालिकेतही आमचीच सत्ता येणार आहे. आमच्या उमेदवारास निवडून दिले, तर मतदारसंघात निधी येईल, हे मतदारांना पटवून द्या. आज आपली सत्ता आहे, आपल्याकडेही यंत्रणा आहे, म्हणून निवडणूक हलक्यात घेऊ नका.’

Back to top button