औरंगाबाद : मित्राने बोलणे थांबविले.. तरुणीने आईचा गळा दाबला | पुढारी

औरंगाबाद : मित्राने बोलणे थांबविले.. तरुणीने आईचा गळा दाबला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तरुणीला तिच्या मित्राने बोलणे बंद केले. त्यामुळे होस्टेल सोडून घरी गेलेल्या तरुणीने चिडचीड करीत आईला दोष देत थेट तिचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी तिची सुटका केली. हा प्रकार दामिनी पथकाला कळविल्यानंतर तरुणीला मनोविकार तज्ज्ञांकडे दाखल केले आहे. पुंडलिकनगरात 16 फेब्रुवारीला हा धक्कादायक प्रकार घडला.

दामिनी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरिता (काल्पनिक नाव) 17 वर्षांची आहे. ती आईवडील, लहान बहीण व भावासोबत पुंडलिकनगरमध्ये राहते. तिचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यात आहे. ते काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात शहरात आले व येथेच स्थायिक झाले. सरिता अभ्यासात हुशार असून, तिला दहावीत कुठलीही शिकवणी नसताना 85 टक्के गुण मिळाले. तिला स्कॉलरशिप मिळाली. तिचा चांगल्या कॉलेजला नंबर लागला. तिने विज्ञान शाखेत शिक्षण सुरू केले. ती एका होस्टेलमध्ये राहू लागली. दरम्यान, तिची एका मुलासोबत मैत्री झाली. ती त्याच्या प्रेमात पडली. याची कुणकुण तिच्या आई-वडिलांना लागली. त्यांनी तिला शिक्षणावर लक्ष दे, असा सल्ला देऊन मैत्री, प्रेम याला विरोध केला. दरम्यान, तिच्या मित्रानेही तिच्याशी बोलणे थांबविले. याचा सरिताला राग आला. पंधरा दिवसांपूर्वी ती होस्टेल सोडून घरी गेली. तिची चिडचीड पाहून आईने घाबरून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र पाच दिवसांपूर्वी तर तिने आईवर हात उगारला. गुरुवारी तर मुलाने तिला स्पष्टपणे मला फोन करू नको, असे सांगितले. त्यावर चिडलेल्या सरिताने आईला खाली पाडून तिचा गळा आवळला होता.

दामिनी मदतीला धावली

हा प्रकार दामिनी पथकाला समजल्यावर पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या सूचनेवरुन हेड कॉन्स्टेबल कल्पना खरात, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे यांनी तत्काळ धाव घेतली. सरिताच्या आईवडिलांना ताब्यात घेत ठाण्यात नेले. सरितालाही बोलावून घेतले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून सरिताला डॉ. कादरी यांच्याशी संपर्क साधून सरितावर उपचार करण्याची विनंती केली.

हेही वाचा :

Back to top button