नगर : व्यावसायिकाची सव्वा कोटींची फसवणूक | पुढारी

नगर : व्यावसायिकाची सव्वा कोटींची फसवणूक

एकरुखे : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी येथील पूर्वी विकलेल्या शेतजमिनीची कागदपत्रे क्लिअर असल्याचे भासवून व घेणार्‍याचा विश्वास संपादन करीत त्या शेत जमिनीचे पुन्हा अनधिकृतपणे खरेदीखत करून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची या जमीन खरेदी व्यवहारात 1 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना घडली.  याबाबत अ. नगर तालुक्यातील वाळकी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक विठ्ठल नाथा धोंडे (वय 63 वर्षे) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी दिल्ली येथील टी अँड एस अपार्टमेंट अ‍ॅण्ड मोटल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व नंदादीप असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच कोलकाता येथील विभोर ट्रॅकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मिळून एकूण सात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर तालुक्यातील वाळकी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक विठ्ठल नाथा धोंडे (वय 63) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दिल्ली येथील ‘टी अँड एस अपार्टमेंट अँड मोटल्स’ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सुरेश कुमार मलिक, रितेश सुरेश मलिक, श्यामलाल धनुका, कांता धनुका, सुशीलकुमार सेहगल तसेच नंदादीप असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अशोककुमार अरोरा व कोलकत्ता येथील विभोर ट्रॅकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शामसुंदर अगरवाल यांच्या विरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे.

धोंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘टी अँड एस अपार्टमेंट अँड मोटल्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे संबंधित संचालकांनी दिल्ली येथील नंदादीप असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अशोक कुमार अरोरा तसेच विभोर ट्रॅकॉन प्रायव्हेट लिमिटेड कोलकत्ता या कंपनीचे संचालक शामसुंदर अग्रवाल यांच्याशी संगणमत करून सुरुवातीस नंदादीप असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांच्याशी जमीन खरेदीखत केलेले असताना पुन्हा विभोर ट्रॅकॉन लिमिटेड कोलकत्ता यांच्यासोबत अनधिकृतपणे खरेदीखत केले आहेत.

दोन्ही कंपन्यांनी जाणून-बुजून खरेदीनंतर मिळकतीच्या सातबारा उतार्‍यावर कंपनीचे नाव न नोंदविता शिर्डी येथील मिळकत क्रमांक 20/2 येथील 40 गुंठे शेत जमीन टी अँड एस अपार्टमेंट अँड मोटल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सुरेश मलिक व त्यांचा मुलगा रितेश मलिक यांनी मला खरेदीखत देऊन खरेदीच्या मोबदल्यात 1 कोटी 31 लाख रुपयांची रक्कम माझ्याकडून स्वीकार करून माझी फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहे. या घटनेप्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली असून, त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

संगनमत केले
आरोपींनी संगणमत करून जाणून-बुजून सातबारा उतार्‍यावर खरेदीचे नाव न लावता शेत जमिनीचे कागदपत्रे क्लियर असल्याबाबत माझा विश्वास संपादन करून, या मिळकतीचे खरेदीपोटी एकूण 1 कोटी 31 लाख रुपये इतकी रक्कम घेऊन माझी फसवणूक केली. अशी फिर्याद विठ्ठल नाथा धोंडे यांनी पोलिसात दाखल केल्यानंतर सदर आरोपींविरोधात राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button