नगर : विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कामकाज बंद पाडले | पुढारी

नगर : विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कामकाज बंद पाडले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काल (दि.17 फेब्रुवारी) रोजी 24 व्या दिवशी पायर्‍यांवर ठिय्या मांडून आंदोलन केले. कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचार्‍यांना कामकाजास मज्जाव केला. घोषणा देत शासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेश दारावर कुणालाही आतमध्ये जाऊ दिले नाही. दरम्यान, शासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, अशी तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

आंदोलक विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात संतप्त झाल्या होत्या. आम्ही रात्रंदिवस थंडीची परवा न करता आंदोलन करीत असताना शासन दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी कुलगुरू प्रशांत पाटील यांच्यासमोर मांडला. कुलगुरूंसह  विद्यापीठाचे विभाग प्रमुखांसह कर्मचार्‍यांवर माघारी फिरण्याची वेळ आली.

गेल्या 24 दिवसांपासून विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे, परंतु शासन कुठल्याच प्रकारची दखल घेत नसल्याने जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन आमचे म्हणणे ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

                                                       – शुभम जगदाळे, आंदोलक

 

तुमच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पाठविल्या आहेत. मागण्या तीव्र आहेत. पुन्हा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. 

                                        – डॉ. प्रशांत पाटील, म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  

 

यांना केला मज्जाव..!

कुलगुरू प्रशांत पाटील, रजिस्टार यु. डी. चव्हाण,  सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्यासह विद्यापीठातील सर्व प्रमुख  अधिकारी शास्त्रज्ञांसह सर्व कर्मचारी कामावर जाण्यास मज्जाव करण्यात आला.

Back to top button