महाशिवरात्री : औंढा नागनाथ नगरीत हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी | पुढारी

महाशिवरात्री : औंढा नागनाथ नगरीत हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त आज (शनिवार) पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. हर हर महादेवाच्या जयघोषणाने नागनाथ नगरी दुमदुमली आहे. पानकनेरगावच्या अविनाश अकमार यांना आज महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाचा पहिला मान मिळाला.

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री साडेबारा वाजता नागनाथाचा अभिषेक झाला. यावेळी आमदार संतोष बांगर, मंदिर संस्थानचे पदसिध्द अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव, मंदिर संस्थानचे मुख्यपुजारी तुळजादास भोपी, वैजनाथ पवार, डफळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

यावर्षी दर्शनाचा पहिला मान सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील अविनाश अकमार यांना मिळाला. त्यांचा नागनाथ संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या गर्भगृहातील अभिषेक बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

मराठवाडयासह बाहेर राज्यातील भाविक मिळेल त्या वाहनाने औढा नागनाथ येथे दाखल होत आहेत. भाविकांच्या गर्दीने औढा नागनाथ मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे कर्मचारी तैनात आहेत. चहा, पाणी व ऊसळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप केला जात आहे. मंदिराच्या परिसरात तसेच मंदिराच्या बाहेर पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे, जमादार रवीकांत हरकाळ, संदीप टाक यांच्यासह पोलिसांचा वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button