नाशिक : शेतकऱ्याच्या गोठ्यातून रात्रीच्या सुमारास शेळ्यांची चोरी | पुढारी

नाशिक : शेतकऱ्याच्या गोठ्यातून रात्रीच्या सुमारास शेळ्यांची चोरी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून रात्रीच्या सुमारास २२ ते २७ अशा लहान मोठ्या शेळ्या चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरी गेलेल्या शेळ्यांची किंमत लाखोंच्या घरात असून त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

सविस्तर वृत्त असे की, येथील युवा शेतकरी सुदाम शहादू आहिरे यांचा शेतीसह शेळ्या पाळण्याचा व्यवसाय आहे. स्वतःच्या घरापासून हाकेच्या अंतरावर त्यांनी या शेळ्यांसाठी लोखंडी पत्रे व जाळ्या वापरून बंदिस्त गोठा तयार केला आहे. या गोठयास रात्री ते कुलूप लावून घरी जातात. या गोष्टीची पूर्ण कल्पना असलेल्या चोरट्यांनी पाळत ठेवून रात्री या गोठ्याचे कुलूप तोडून या शेळ्यांची चोरी केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुमारे चार ते पाच किलोमीटरचा डोंगर पायी पार करत कासारी घाटातील रस्त्यावरुन शेळ्या नेत व तेथून त्या अज्ञात वाहनद्वारे पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जात बोलठाण आउटपोस्टचे पोलीस गांगुर्डे यांनी पाहणी केली असून ते पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून, तर पाळीव जनावरे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

Back to top button