भंडारा : शिफारस पुढे पाठविण्यासाठी लाच घेणं पडलं महागात; तिघांना अटक | पुढारी

भंडारा : शिफारस पुढे पाठविण्यासाठी लाच घेणं पडलं महागात; तिघांना अटक

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शेतीची पाहणी करून विकास व छाननी शुल्क पावती देण्यासाठी तसेच रेखांकन मंजुरीसाठी अंतिम शिफारस पुढे पाठविण्यासाठी मोबदला म्हणून रुपये १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी करणे तिघांना चांगलेच महागात पडले. ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि. १६ फेब्रुवारी) रोजी लाखांदूर येथे करण्यात आली आहे. नगर पंचायतचे कनिष्ठ लिपीक विजय राजेश्वर करंडेकर ( वय ४०), स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड (वय २८) व खासगी वाहनचालक मुखरण लक्ष्मण देसाई ( वय ४५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार प्रकाश यादवराव बोरकर (वय ४५, रा. लाखांदूर) यांच्या मालकीची शेती लाखांदूर नगर पंचायत हद्दीत आहे. या जागेला रहिवासी प्रयोजनार्थ प्रस्तावित अभिन्यासास विकासात्मक परवानगी मिळवून देण्यासाठी तसेच शेतजमीन अकृषक करण्यासाठी त्यांनी लाखांदूर नगरपंचायतशी संपर्क साधला. हे काम करून देण्यासाठी विजय करंडेकर, गजानन कराड आणि मुखरण देसाई या तिघांनी १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली.

बोरकर यांनी या घटनेची तक्रार नागपूर येथील लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानुसार नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहात पकडले. यानंतर तिघांविरोधात कलम ७ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन) सन २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही कारवाई नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक वर्षा मते, पोलिस निरीक्षक आशिष चौधरी, अमोल मेंघरे, अनिल बहिरे, अस्मिता मलेलवार, हर्षलता भरडकर यांनी केली.

Back to top button