ऑस्‍ट्रेलियाची ‘फिरकी’ घेत अश्‍विनने मोडला हरभजन सिंगचा विक्रम! | पुढारी

ऑस्‍ट्रेलियाची 'फिरकी' घेत अश्‍विनने मोडला हरभजन सिंगचा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला.  दुसर्‍या डावात भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्‍ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडली. आर. अश्‍विनने निम्‍मा संघ तंबूत धाडला. या सामन्‍यात त्‍याने ऑस्‍ट्रेलियाच्‍या पहिल्‍या डावात तीन आणि दुसर्‍या डावात पाच बळी घेतले. या कामगिरीमुळे त्‍याने एक नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. ( Ashwin breaks harbhajan record )

अश्‍विनने ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघ तंबूत धाडला

नागपूर कसोटी पहिल्‍या डावात भारताने निर्णायक २२३ धावांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या डावात ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजांची अश्‍विनच्‍या फिरकीसमोर भंबेरी उडाली. आर. अश्‍विनने सलामीवीर उस्‍मान ख्‍वाजा याला पाच धावांवर बाद केले. १४ व्‍या षटकामध्‍ये  त्‍याने १० धावांवर खेळणार्‍या डेव्‍हिड वॉर्नरला पायचीत केले. यानंतर मॅट रेनशॉ, पीटर हैंड्सकॉम्ब आणि एलेक्‍स कॅरी या तिघांनाही पायचीत करत ५२ धावांवरच ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघत तंबूत धाडला.

३१ वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स

अश्विनने याने आपल्‍या कसोटी क्रिकेटच्‍या कारकीर्दीत ३१ वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करण्‍यामध्‍ये श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर असून त्‍याने ६७ वेळा पाच किंवा त्‍याहून अधिक बळी घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (३७), न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली (३६), अनिल कुंबळे (३५), श्रीलंकेचा रंगना हेराथ (३४) आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन याने ३२ वेळा पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक विकेट आपल्‍या घेतल्‍या आहेत.

अश्विनने कुंबळेची ‘या’ विक्रमाशी साधली बरोबरी

अश्विनने २५ वेळा घरच्या मैदानावर कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करत त्‍याने भारतीय संघाचा माजी कर्णधार, फिरकीपटू अनिल कुंबळेच्‍या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अनिल कुबळे यानेही घरच्‍या मैदानावर २५ वेळा कसोटी सामन्‍याच्‍या एका डावात पाच किंवा त्‍याहून अधिक बळी घेतले होते.

मायदेशात विकेट घेण्‍यात शेन वॉर्नला टाकले मागे

अश्विनने घरच्या मैदानावर आतापर्यंत ३२० विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नलाही मागे टाकले. वॉर्नने ऑस्ट्रेलियात ३१९ विकेट घेतल्या होत्‍या. मायदेशात खेळताना अनिल कुंबळे (३५०), इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (३७०), जेम्स अँडरसन (४२९) आणि मुरलीधरन याने (४९३) विकेट घेतल्‍या आहेत.

Ashwin breaks harbhajan record

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध  त्याने १९ कसोटीत ९७ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने हरभजन सिंगचा विक्रम मोडित काढला आहे. हरभजनने ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध १८ कसोटीत ९५ बळी घेतले होते. ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध  सर्वाधिक विकेट घेण्‍यात अश्‍विन दुसर्‍या क्रमाकांवर आहे. अनिल कुंबळेने २० कसोटीत १११ विकेट घेत आजही अग्रस्थानी आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button