नागपूर : बेसा बेलतरोडीत ५ वर्षीय मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला, घातपाताचा संशय | पुढारी

नागपूर : बेसा बेलतरोडीत ५ वर्षीय मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला, घातपाताचा संशय

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – काल दुपारी ३ वाजतापासून घरासमोरून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आज सकाळी तिच्याच घराजवळील पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने बेसा बेलतरोडी परिसरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे काल या ठिकाणी तिचा थांगपत्ता लागला नसताना आज ती याच टाकीसापडल्याने या मुलीचा घातपात करून मृतदेह पाण्यात फेकल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

बेलतरोडी ठाण्याच्या हद्दीतील बेसा परिसरात जन्मतः मूकबधिर असलेली ज्योती शाहू नावाची ही ५ वर्षीय मुलगी काल दुपारी ३ वाजता तिच्या घरासमोरून बेपत्ता झाली. या घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या मुलीला शोधण्यासाठी काल पोलिसांनी अथक परिश्रम घेतले. मात्र पत्ता लागला नाही. आज पहाटे मुलीचे वडील राजू शाहू घराजवळून २०० मीटर अंतरावर असलेल्या पडिक जागेतील प्लॉटच्या मधोमध तयार असलेल्या टाकीत जाऊन लाकडी दांड्याच्या सहाय्याने मुलीचा शोध घेत असताना त्यांना मुलगी दिसली.

विशेष म्हणजे याच दूषित पाण्याच्या टाकीत काल पोलिसांसह अनेक लोकांनी ज्योतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा ती या टाकीत नव्हती. ज्योतीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की यामागे अजून दुसरे कुठले कारण आहे, हे शवविच्छेदन रिपोर्टमधूनच पुढे येणार आहे.

ज्योतीचे आई-वडील मूळचे छत्तीसगढचे राहणारे असून कामाच्या शोधात ते नागपूरला आले आहेत. त्यांना ४ मुली असून ज्योती धाकटी आहे. ती जन्मापासूनच बोलू शकत नव्हती. बेलतरोडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Back to top button