पिंपरी : पिस्तूल, कोयत्यानंतर आता ‘मिशन वॉन्टेड’ | पुढारी

पिंपरी : पिस्तूल, कोयत्यानंतर आता 'मिशन वॉन्टेड'

संतोष शिंदे : 

पिंपरी : पंधरा दिवसांची शस्त्रविरोधी मोहीम राबवल्यानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मिशन वॉन्टेड सुरू केले आहे. यामध्येदेखील पोलिस ठाणे व शाखा यांच्याअंतर्गत स्पर्धा लावण्यात आल्या आहेत. फरारी व पाहिजे आरोपी अटक केल्यास अनुक्रमे 25 व 5 असे गुण मिळणार आहेत. तसेच, वॉरंट बजावणी करून अटक केल्यास 1 सीआरपीसी 82 प्रमाणे जाहीरनामा प्रसिद्ध केल्यास 10 गुण देण्यात येणार आहे. मंगळवारपासून (दि. 7) सुरू केलेली ही मोहीम 10 मार्चपर्यंत राहणार आहे.

दरोडाविरोधी पथक विजेता
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. पंधरा दिवसांच्या या मोहिमेत तब्बल 253 शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. कोयता किंवा तत्सम हत्यार पकडल्यास 1 आणि पिस्तूल पकडणार्‍या पोलिसांना 10 गुण देऊन अंतर्गत स्पर्धा लावण्यात आली होती. यामध्ये दरोडाविरोधी पथकाने 150 गुण मिळवून स्पर्धेचा विजेता किताब पटकाविला. तर, 107 गुण प्राप्त करून गुंडाविरोधी पथक उपविजेता ठरले. युनिट चार 67 गुण मिळवून तिसर्‍या क्रमांकावर राहिले. पोलिस ठाण्यामध्ये महाळुंगे, शिरगाव, पिंपरी अनुक्रमे आघाडीवर राहिले.

गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा उद्देश
या मोहिमेमुळे अवघ्या पंधरा दिवसांत 48 पिस्तूल व 205 धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. यातून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांचा अंतर्गत स्पर्धा लावण्याचा फंडा यशस्वी ठरल्याचे दिसून आले. पहिली मोहीम फत्ते झाल्यानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लगेचच ‘मिशन वॉन्टेड’ सुरू केले आहे. यामध्येदेखील पोलिस ठाणे व शाखांमध्ये अंतर्गत स्पर्धा लावण्यात आली आहे. आता पोलिस आयुक्तांनी सुरू केलेल्या दुसर्‍या स्पर्धेत कोण यशाचा मानकरी ठरतोय अन कोण रोशाचा, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महिन्यानंतर होणार मूल्यमापन
महिन्याभराच्या विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवाईचे मूल्यमापन गुणांकन पध्दतीने करण्यात येणार आहे. फरारी व पाहिजे आरोपी अटक केल्यास अनुक्रमे 25 व 5 असे गुण मिळणार आहेत. तसेच, वॉरंट बजावणी करून अटक केल्यास 1, सीआरपीसी 82 प्रमाणे जाहीरनामा प्रसिद्ध केल्यास 10 गुण देण्यात येणार आहे.

अन्यथा करावा लागेल रोषाचा सामना
या वेळीदेखील प्रथम तीन क्रमांक येणार्‍या पोलिस ठाणे/शाखा यांना प्रशस्तिपत्रक व बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच, शेवटून तीन पोलिस ठाणे/ शाखा यांची नोंद होणार आहे. मागील शस्त्र विरोधी मोहिमेत ज्यांनी आळस केला. त्यांच्यासाठी ही मोहीम करो या मरो, अशीच ठरणार आहे. पुन्हा तीच ठाणी किंवा पथके मागे राहिल्यास त्यांना पोलिस आयुक्तांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.

शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांवर कारवाई होणे हा मागील मोहिमेचा मूळ उद्देश होता. ज्यामध्ये आम्हाला चांगले यश मिळाले आहे. आतादेखील फरारी किंवा पाहिजे आरोपींना मोठ्या संख्येत जेरबंद करण्याचा हेतू आहे. यामध्येदेखील आमचे पोलिस चांगले काम करतील.
-विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

Back to top button