Leopard : चंदगड तालुक्यात घरबंद केलेला बिबट्या खिडकीचे गज वाकवून पळाला ! | पुढारी

Leopard : चंदगड तालुक्यात घरबंद केलेला बिबट्या खिडकीचे गज वाकवून पळाला !

बेळगाव; संदीप तरिहाळकर : Leopard : बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या बांद्राई धनगरवाडा (ता. चंदगड) येथे मंगळवारी रात्री भक्ष्याच्या शोधात घरी शिरलेल्या एका बिबट्याला त्या घरच्या सदस्यानी घरबंदी केले. रात्री १२ वाजता चंदगड वनखात्याने सदर बिबट्या कुलूपबंद करून सकाळी सापळा आणून पकडण्याचे निश्चित केले.

मात्र मध्यरात्री नंतर सदर घराच्या दीड बाय दोन फूट इतक्‍या खिडकीची लोखंडी पात (गज) वाकवून सदर बिबट्याने पुन्हा जंगलात धूम ठोकली. त्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजता कोल्हापूर येथून घटनास्थळी पोहोचलेली वनखात्याची रेस्क्यू टीम हात हलवत परत निघाली. या नाट्यमय घडामोडीने पुन्हा सदर बिबट्याचा हल्ला पुन्हा होईल, यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

Leopard  : बिबट्या स्वयंपाक खोलीतच लपून बसला

रामू भागु लांबोर यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. त्यांनी पळलेल्या कुत्र्याचा पाठलाग करत सदर सव्वा तीन फूट उंचीचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या अचानक घरी यानंतर लगेच बिबट्या स्वयंपाक खोलीतच लपून बसला. लागलीच घरातील रामू यांची पत्नी सावू, मुलगी निकिता, मुलगा सुभाष, दोन वर्षाचा मुलगा व एका लहान ६ महिन्याचे बाळ असे सहा जण मोठ्या शिताफीने घराबाहेर पडले.

Leopard : वनखात्याची विशेष रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली मात्र

यानंतर लगेच त्यांनी घराचा दरवाजा बंद करून वनखात्याला निरोप दिला. यानंतर रात्री बारा वाजता पाटणे वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. बंद केलेल्या दरवाजाला कुलूप लावले. सकाळी रेस्क्यू टीममार्फत बिबट्याला जेरबंद करण्याचे नियोजन केले. मात्र पहाटे साडे पाचच्या दरम्यान सुभाष लांबोर यांनी पाहणी केली असता सदर बिबट्या दीड बाय दोन फुटाच्या खिडकीचे लोखंडी पाती वाकवून धूम ठोकल्याचे निदर्शनास आले. कोल्हापूर येथून वनखात्याची विशेष रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली मात्र घरबंदी केलेला बिबट्या अचानकपणे पळून गेल्याने त्यांची निराशा झाली.

खानापूर तालुक्याच्या जंगल क्षेत्राला लागून लागून बेळगाव तालुक्यातील धामणे जंगलक्षेत्र आहे. येथेही धनगरवाडा आहे. या ठिकाणाहून चार किलोमीटरवर बांद्राई हा चंदगड तालुक्यातील धनगरवाडा आहे. वर्षभर अधूनमधून वाघ व बिबट्याचे दर्शन होत आहे.

अनेक वेळा बिबट्याने धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांना ठार केले आहे. मंगळवारी दि. २८ रोजी विजसेवा ठप्प असल्याने मोठी धांदल उडाली. जंगल परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने वनखात्याला संपर्क साधण्यात अडथळा येत होता.

शेजारील डोंगरावर जाऊन वनखात्याला निरोप देण्यात आला होता. परिसरातील चंदगड व बेळगाव तालुक्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन चंदगड वनखात्याने केले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button