पुणे : शिवजयंती तयारीच्या बैठकीचा राजकीय मंडळींना विसर ; केवळ दोन माजी नगरसेवक उपस्थित | पुढारी

पुणे : शिवजयंती तयारीच्या बैठकीचा राजकीय मंडळींना विसर ; केवळ दोन माजी नगरसेवक उपस्थित

पुणे : पुढारी वृतसेवा : शिवजयंतीच्या पूर्वतयारीसाठी महापालिकेने दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या बैठकीकडे राजकीय मंडळींनीच पाठ फिरविली. केवळ दोन माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. नगरसेवकपद नसल्याने माननीयांना शिवजयंतीच्या तयारीच्या बैठकीचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  दरवर्षीप्रमाणे महापालिकेच्या वतीने 19 फेब—ुवारीच्या शिवजयंतीच्या तयारीसाठी महापालिकेत बैठक बोलविण्यात आली. दरवर्षी महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. मात्र, यावर्षी प्रशासकराज असल्याने आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्यात आली होती.

त्यास शहरातील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच पोलिस अधिकारीही उपस्थित होते. मात्र, सर्वपक्षीय राजकीय मंडळीतून केवळ भाजपच्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे एक माजी नगरसेवक हे दोघेच बैठकीला हजर होते. त्यामुळे उपस्थितांनीही माजी राजकीय पदाधिकारी आणि माजी नगरसेवक गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, या बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावरून निघणार्‍या शिवरथाच्या स्वागतासाठी महापालिकेची सर्वोतोपरी तयारी झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मिरवणुकांना आवश्यक सर्व परवानगीकरिता एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. पोलिसांकडून सर्वांना एकाच ठिकाणी परवाना देण्याची सोय करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विसर्जन मार्गावर शिवरथांना अडथळा होऊ नये यासाठी रस्त्याच्यामधे आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे तसेच स्वच्छता व सुशोभीकरण केले जाणार आहे. या वेळी उपस्थित प्रतिनिधींनी काही सूचना केल्या. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसचिव शिवाजी दौंडकर, उपायुक्त माधव जगताप आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी शिवजयंतीसाठी तरतूद करावी
शिवजयंती साजरी करणे हे प्रशासनाचे काम नाही, तर ते लोकप्रतिनिधींचे म्हणजेच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांचे काम आहे. लोकप्रतिनिधी नसताना हे काम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून शिवजयंतीसाठी तरतूद केली पाहिजे, अशी मागणी शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

Back to top button