पुणे : भोरवाडी येथे उड्डाणपुलाची गरज | पुढारी

पुणे : भोरवाडी येथे उड्डाणपुलाची गरज

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भोरवाडी-तांबडेमळा येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची गरज आहे. या महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन चर्चा करीत ही मागणी केली. मंचर बाह्यवळण जेथून सुरू होतो, त्या भोरवाडी फाट्यावर उड्डाणपुलाचे काम होणे गरजेचे आहे. नुसता चौक विकसित करून यावरील वाहतूक कोंडी व अपघात टाळता येणार नाहीत. येणारी वाहने मंचर परिसरात जाताना हा रस्ता क्रॉस करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याचे डीपीआर बनविताना ही चूक झाली आहे, तसेच या चौकातील काही मीटर अंतरावर उपजिल्हा रुग्णालयाची मोठी वास्तू उभारली जाणार असून, एसटी आगारही त्याच ठिकाणी झाले आहे. या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये संपूर्ण स्वतंत्र सेवा रस्ता होणे गरजेचे आहे. याबाबतची आग्रही मागणी पुणे-नाशिक राष्ट्रीय मार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन प्रत्यक्षात चर्चा करीत केली. याबाबत तातडीने मंजुरी देऊन आदेश करावेत, अशी विनंती त्यांनी केली.

यापूर्वी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित रस्त्याबाबत विभागाला सूचना केलेल्या आहेत. संबंधित बाब ही अत्यंत महत्त्वाची असून, भविष्यातील अपघात व वाहतूक कोंडीमुळे सद्य:स्थितीत काम करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मेदगे यांनी गडकरींना प्रत्यक्ष भेटीमध्ये सांगितले.

Back to top button