पिंपरी : रासायनिक सांडपाणी वाहिन्यांची शोधमोही; कठोर कारवाईचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा | पुढारी

पिंपरी : रासायनिक सांडपाणी वाहिन्यांची शोधमोही; कठोर कारवाईचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक कंपन्या, उद्योग व लघुउद्योगात निर्माण होणारा रसायनयुक्त सांडपाण्याच्या वाहिना थेट ड्रेनेजलाइनला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीप्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी पवना, इंद्रायणी व मुळा नदीला जोडलेल्या सर्व ड्रेनेज लाइनची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी थेट पालिकेच्या ड्रेनेज लाइन जोडल्याने पालिकेच्या ड्रेनेज विभागाने सहा कंपन्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. त्या संदर्भात विचारले असता ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले की, शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदीत मिसळणार्‍या सांडपाण्यात रासायनिक सांडपाणी मिसळत आहे किंवा नाही याचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी नाले व नदी पात्रास जोडलेले ड्रेनेजलाइनची तपासणी केली जात आहे.

त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. त्याला आढावा सातत्याने घेतला जात आहे. ड्रेनेजलाइनला रासायनिक सांडपाणीवाहिनी जोडण्यास किंवा सोडल्यास तसेच, थेट नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडण्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासन सक्तीने पावले उचलत आहे. थेट ड्रेनेजलाइन किंवा नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार कोणाला आढळून आल्यास पालिकेच्या ड्रेनेज विभाग किंवा सारथी हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button