गडचिरोली : ‘उमेद’च्या प्रक्रिया उद्योगाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
गडचिरोली ; पुढारी वत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील प्रकिया उद्योगाच्या युनिटला काल (रविवार) रात्री भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची यंत्रसामग्री व अन्य साहित्य जळून खाक झाले.
उमेद प्रकल्पांतर्गत जिल्हाभर महिला बचत गट कार्यरत असून, अनेक बचत गट फळे आणि वनोजपजावर आधारित प्रक्रिया उद्योग चालवीत आहेत. असेच जांभूळ व सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे युनिट रामगड येथे आहे. परंतु मध्यरात्री या युनिटला अचानक भीषण आग लागली. पहाटे आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुरखेडा येथून अग्निशमन वाहनही बोलावण्यात आले. परंतु तोपर्यंत बॅटऱ्या, यंत्रे, कॅरेट, पल्प, बिया, फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाली होती. या आगीमुळे उमेदचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
प्रकिया उद्योगामुळे शेकडो महिलांना रोजगार मिळाला असून, त्या स्वयंभू झाल्या आहेत. मात्र, आग लागल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकले नाही. कुणी जाणीवपूर्वक तर आग लावली नाही ना, याविषयीचे सत्य पोलिस तपासात पुढे येईल. आज सकाळी जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या विषयी पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल भोपये यांनी दिली.
हेही वाचा :
- Joshimath चे भूस्खलन थांबवून दाखवा, तर चमत्कार मानतो : धीरेंद्र शास्त्रींना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचे आव्हान
- Balasaheb Thackeray Birth Anniversary : कोल्हापुरच्या माणसामूळे बाळासाहेब ठाकरेंचे ‘साठ रुपये’ फुकट गेले, पण हात मात्र वाचला…जाणून घ्या किस्सा
- Corona Update : कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण; दिवसभरात ९४ रुग्णांची भर