Joshimath चे भूस्‍खलन थांबवून दाखवा, तर चमत्‍कार मानतो : धीरेंद्र शास्त्रींना शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंदांचे आव्हान | पुढारी

Joshimath चे भूस्‍खलन थांबवून दाखवा, तर चमत्‍कार मानतो : धीरेंद्र शास्त्रींना शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंदांचे आव्हान

रायपूर : पुढारी ऑनलाईन- बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. नागपूर मधील त्‍यांच्या कार्यक्रमादरम्‍यान अंनिसने धीरेंद्र शास्त्री यांना खुले आव्हान दिले होते.  यांनतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ अनेकांची विधाने समोर येत आहेत. तसेच धीरेंद्र शास्त्री हेही एका पाठोपाठ एक विधान करत असल्‍याने ते माध्यमांच्या केंद्रस्‍थानी आले आहेत. दरम्‍यान, शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंद यांनी धीरेंद्र शास्त्री यांना उत्‍तराखंड मधील जोशी मठाचे होणारे भूस्‍खलनाचे रोखून दाखवण्याचे खुले आव्हान दिले आहे.

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्वरानंद यांनी धीरेंद्र शास्त्री यांचे नाव न घेता चमत्‍काराचा दावा करणाऱ्यांनी जोशीमठमधील होणारे भूस्‍खलन थांबवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. भूस्‍खलन थांबवून दाखववले तर त्‍यांचे चमत्‍कार मान्‍य करीन, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. केवळ प्रसिद्धीसाठी चमत्‍कार करण्याचा दावा करत असतील तर आम्‍ही त्‍या गोष्‍टीला मान्यता देउ शकत नाही, असेही ते म्‍हणाले.

धर्मांतराविरोधात आवाज उठवल्याने ख्रिश्चन मिशनरी आपल्याविरुद्ध कट रचत असल्याचा आरोप धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मात्र धर्मांतर हा राजकीय मुद्दा असल्याचे म्हटले आहे. त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलणाऱ्यांना धार्मिक कारण नसते, असेही ते म्हणाले.

नागपूर मधील कार्यक्रमादरम्‍यान अंनिसने ११ जानेवारी रोजी धीरेंद्र शास्त्री यांना त्‍यांची शक्‍ती सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. यानंतर अनेक लोकांनी धीरेंद्र शास्त्री बाबांना आव्हान दिले आहे. तर दुसऱ्या बाजुला भाजपचे राष्‍ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि आमदार नारायण त्रिपाठी यांनी त्‍यांचे खुले समर्थन केले आहे.

धीरेंद्र शास्त्री हे आपला दरबार भरवतात. ते भक्‍तांच्या मनातील समस्‍या कागदावर लिहितात आणि तिचे निराकरण करतात, अशी त्‍यांच्या भक्‍तांची श्रद्धा आहे. त्‍यांच्या भक्‍तांच्या मनातील अडचणी ओळखून कागदावर लिहिण्याच्या प्रकारावर अंनिसने नागपुरात सर्वांसमक्ष हे सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. यानंतर बाबांनी तीथला दरबार हलवला. यानंतर धीरेंद्र शास्त्री बाबांकडून अनिसला त्‍यांच्या दरबारात या मग चमत्‍कार दाखवतो, असे आव्हान दिले होते.

हेही वाचा : 

Back to top button