औरंगाबादमध्ये जी-२०चा मुहूर्त ठरला; शिष्टमंडळ २६ फेब्रुवारीला येणार, २७, २८ ला बैठक | पुढारी

औरंगाबादमध्ये जी-२०चा मुहूर्त ठरला; शिष्टमंडळ २६ फेब्रुवारीला येणार, २७, २८ ला बैठक

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जी-२० देशांची एक बैठक जिल्ह्यात होणार असून त्यासंदर्भातील मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीला जी-२० देशांतील महिला सदस्यांचे शिष्टमंडळ शहरात येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत २७, २८ फेब्रुवारीला महिला परिषद आणि वेरुळ लेणी पाहणी दौरा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्ड्ये यांनी दिली आहे.

देशाला पहिल्यांदाच जी-२० देशांच्या शिखर परिषदेचे यजमानपद मिळाले आहे. डिसेंबरपासून या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. त्यानुसार देशातील निवडक शहरांमध्ये सध्या जी-२० देशाचे शिष्टमंडळ भेटी देऊन बैठका घेत आहेत. महाराष्ट्रातील चार शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूरचा समावेश आहे. यातील मुंबईत एक बैठक झाली आहे. तर पुण्यातील बैठक सोमवारीच पार पडली आहे. पुण्यात अतिशय परफेक्ट नियोजन झाल्याने शिष्टमंडळाने कौतुक केले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपर्यंत जिल्ह्यात होणाऱ्या बैठकीचे वेळापत्रकच निश्चित नसल्याने प्रशासकीय यंत्रणा त्याच प्रतीक्षेत होते. अखेर हे वेळापत्रक निश्चित झाले असून यात २६ फेब्रुवारीला १९ देशांचे १५० सदस्यांचे शिष्टमंडळ शहरात येणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारीला वंदे मातरम् सभागृहात महिला परिषदचा शुभारंभ होणार असून या परिषदेचे दुसरे सत्र हाॅटेल रामामध्ये होणार आहे. यावेळी महिलांच्या विविध विषयावर परिषद होणार असून रात्रीचे भोजन हॉटेल रामा मध्येच होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारीला रामामध्ये बैठक आणि समारोप होणार असून दुपारनंतर ते वेरुळ लेणीला भेट देतील, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाला प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी पाण्डये यांनी सांगितले.

       हेही वाचलंत का ?

Back to top button