

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारी विभाग तसेच संघटनांमधील नवनियुक्तांना ७१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण केले. यावेळी विविध ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, हा २०२३ चा पहिला रोजगार मेळावा आहे. या वर्षाची सुरूवात उज्जव भविष्याची नवीन उमेदीसोबत झाली आहे. सर्व नवनियुक्त तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देताना येत्या काळात आणखी लाखो कुटुंबीयांना सरकारी नोकरीत नियुक्ती मिळणार असल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
केंद्र सरकार (PM Modi) एनडीए तसेच भाजप शासित राज्यांमध्ये सातत्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करीत आहे. हे रोजगार मेळावेच आता आमच्या सरकारची ओळख बनली आहे. यावरुन सरकारने घेतलेल्या संकल्प कशाप्रकारे सिद्ध केले जातात, याची प्रचिती येते, असे पंतप्रधान म्हणाले. भरती प्रक्रियेत व्यापक प्रमाणात बदल झाले आहेत. केंद्रीय सेवांमध्ये भरती प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत जास्त प्रभावी तसेच कालबद्ध झाली आहे. भरती प्रक्रियेत असलेल्या पारदर्शकता तसेच वेग सरकारच्या प्रत्येक कार्यात दिसून येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आलेली भरती तसेच पदोन्नती तरुणांमध्ये विश्वास निर्माण करते. ही बाब पारदर्शक पद्धतीने भरती स्पर्धेत उतरण्यासाठी तरुणांना प्रेरित करते. सरकारच याच दिशेने सातत्याने कार्यरत आहे, असे मोदी म्हणाले. वेगाने पुढे वाटचाल करणाऱ्या भारतात रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधीत सातत्याने वाढ होत आहे. विकास वेगाने होतो. तेव्हा स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात. आज स्वयंरोगाराचे क्षेत्र खूप विस्तारत आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये व्यापार पातळीवर मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये विकास केल्याने रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध झाल्या. पायाभूत सुविधांमध्ये १०० लाख कोटींची गुंतवणूक रोजगाराच्या अनंत संभावनांसाठी दरवाजा उघडत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
यापूर्वी रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल. तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल, असा विश्वास पंतप्रधान कार्यालयाने व्यक्त केला होता. देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त, केंद्र सरकार अंतर्गत कनिष्ठ अभियंते, लोको पायलट, तंत्रज्ञ, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर, सामाजिक सुरक्षा अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहु-उद्देशीय स्टाफ-एमटीएस, अशा विविध पदांवर निवड झालेल्यांना पंतप्रधानांनी नियुक्तीपत्र वितरित केले.
हेही वाचलंत का ?