बाळासाहेबांसमोर झुकलेल्या मोदींचे बॅनर मुंबईभर झळकले! | पुढारी

बाळासाहेबांसमोर झुकलेल्या मोदींचे बॅनर मुंबईभर झळकले!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे भाजपने मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठे कटआऊट उभारले आहेत. यात बाळासाहेबांसमोर मोदींनी मान झुकवलेले कटआऊट मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होते. केवळ भाजपला डिवचण्यासाठी हे कटआऊट शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबईतील गिरगाव व मरीन ड्राईव्ह परिसरात लावले आहेत. मात्र, शिवसेनाप्रमुख हे वंदनीय असल्यामुळे मोदी यांनी मान झुकून त्यांना नमस्कार केल्याचे सांगत, भाजपने शिवसेनेला प्रतिउत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी भाजपने संपूर्ण मुंबई शहरामध्ये मोदींच्या स्वागताचे व जाहीर सभेचे मोठे कटआऊट लावले होते. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही मोठमोठे कटआऊट होते. त्यामुळे भाजपला डिवचण्यासाठी दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही नावाचा उल्लेख न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर नरेंद्र मोदी मान झुकून नमस्कार करत असलेले कटआऊट लावले. हे कटआऊट कोणी लावले हे माहीत नसले, तरी ते शिवसेनेकडूनच लावल्याचे सांगण्यात येत आहे. या कटआऊटच्या माध्यमातून बाळासाहेबच कसे सर्वोच्च आहेत, हे सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता.

या माध्यमातून शिवसेनेने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला असला, तरी भाजपने त्याचे स्वागतच केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संपूर्ण देशासाठी ते वंदनीय आहेत. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले त्यांना आम्ही रस्त्यावर सोडून दिले असल्याचा टोला भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Back to top button