Sangli : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा मोठा निर्णय; व्यावसायिकांचा कोणत्याही बंदमध्ये १२ वाजेपर्यंतच सहभाग | पुढारी

Sangli : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा मोठा निर्णय; व्यावसायिकांचा कोणत्याही बंदमध्ये १२ वाजेपर्यंतच सहभाग

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वारंवारच्या बंदला इस्लामपूर शहरवासीय वैतागले आहेत. येथील व्यापारी महासंघाच्या वतीने बुधवारी (दि. १८) बंदबाबत महत्वपूर्ण घेण्यात आला आहे. यापुढे शहरात कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा कोणीही बंद पुकारला तरी व्यापारी, व्यवसायिक त्या बंदमध्ये बारा वाजेपर्यंतच सहभागी होतील. त्यानंतर व्यापारी आपापले व्यवसाय सुरू करतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. व्यापारी महासंघाच्यावतीने याबाबतचे फलक शहरात लावण्यात आले आहेत.

पूर्वसूचना न देता कोणीही, कधीही बंद पुकारतो. त्यामुळे व्यापारी, व्यवसायिक वर्ग वेठीस धरला जातो. नागरिकांचीही गैरसोय होते. हे लक्षात घेऊन व्यापारी महासंघाने बुधवारी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत आज ही भूमिका जाहीर केली. गांधी चौक आणि बस स्थानक परिसरात या निर्णयाचे फलक झळकले.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील म्हणाले, बंद पुकारणारे लोक वैयक्तिक फायद्यासाठी व्यापाऱ्यांना गृहीत धरतात. व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान आणि ग्राहकांची गैरसोय विचारात घेतली जात नाही. कोरोना संसर्गामुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. त्यातून अद्याप ते सावरले नाहीत. कुणी ना कुणी सतत त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी बंद पुकारत असतात.

हेही वाचा

Back to top button