Yavatmal Bribery Case : ९० हजारांची लाच घेताना नगरसेवक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

Yavatmal Bribery Case : ९० हजारांची लाच घेताना नगरसेवक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : देशी दारूचे दुकान हटवण्यासंदर्भात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवकाने ९० हजार रुपयांची लाच (Yavatmal Bribery Case) मागितली. ही लाच स्वीकारताना मारेगाव येथील नगरसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.१८) दुपारी मारेगाव येथे केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

अनिल उत्तम गेडाम ( वय ४५) असे अटक केलेल्या नगरसेवकाचे नाव आहे. मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनिल गेडाम विद्यमान नगरसेवक आहे. येथील प्रभागात मागील अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान हटवण्यासाठी नगरसेवक गेडाम याने नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अर्थपूर्ण व्यवहार केल्यास ही तक्रार मागे घेऊ, असा निरोप गेडाम याने तक्रारदाराला पाठवला होता. नगरसेवकाच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट अमरावती व यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली (Yavatmal Bribery Case) होती.

त्यानुसार आज दुपारी मारेगाव- कान्हाळगाव मार्गावरील देशी दारू दुकानासमोरच लाचलुचपत पथकाने सापळा रचला. यावेळी ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगरसेवक अनिल गेडाम याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, महेश वाकोडे, सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button