नागपूर शिक्षक विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या पाठिंब्याचा घोळ संपेना | पुढारी

नागपूर शिक्षक विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या पाठिंब्याचा घोळ संपेना

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप पुन्हा हा मतदारसंघ काबीज करण्याच्या इराद्याने कामाला लागला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे समर्थन नेमके कोणाला? याचा गोंधळ अजूनही संपता संपत नसल्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात अद्याप पक्षाचा अंतिम निर्णय झालेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. तर माजी आमदार, काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख ज्यांनी पटोले यांना टार्गेट केले. त्यांनी आज शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर करीत पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे.

माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना काल आपल्या घरी बैठक घेत समर्थन जाहीर केले. आता पटोले यांनी हा निर्णय अजून झालाच नाही, असे घुमजाव केल्याने घोळ अधिकच वाढला आहे. काँग्रेसचाच निर्णय होत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये एकंदरीत गोंधळाचे वातावरण असून ३९ हजारांवर मतदार, ६ जिल्ह्यांचा अंतर्भाव असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सामना भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार नागो गाणार यांच्याशी होणार आहे.

सुरुवातीला काँग्रेसने सुधाकर अडबाले यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले. मात्र, आता पक्षाने अद्याप कुठलाच निर्णय घेतला नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार यांनी वडेट्टीवार यांच्या घरी बैठक घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. त्यावेळी विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीला पाठिंबा देण्याचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्ती पक्षाने करावी, असे आवाहनही आशिष देशमुख यांनी केले आहे. दरम्यान, आमदार कपिल पाटील यांनी देखील काँग्रेसमधील अनेक नेत्यांची मदत शिक्षक भारतीचे झाडे यांनाच असल्याचा दावा केल्याने अडबाले की झाडे यांच्यासाठी काम करायचे असा प्रश्न काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्यापुढे आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button