

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथील येळी शिवारात गजानन अंकूश नागरे (वय ३५, रा.येळी) याचा किरकोळ कारणावरुन खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोपीचंद आव्हाड व दामोदर नागरे या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आज (दि.१८) औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गजानन नागरे हा रविवारी रात्री मित्रासोबत येळी शिवारातील आखाड्यावर गेला होता. त्याठिकाणी गोपीचंद मारूती आव्हाड याच्यासोबत त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. दामोदर भागोजी नागरे याने मध्यस्थी करीत हा वाद मिटवला; परंतु काही वेळाने पुन्हा त्याच्यातला वाद विकोपाला गेला. गोपीचंद बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेला गजानन जागीच कोसळला. गजानन याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोपीचंद्र व दामोदर या दोघांनी त्याचा मृतदेह ओढत एका हळदीच्या शेतात फेकून दिला.
वडिलांनी गजाननचा शोध घेतला. एका हळदीच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, जमादार संदीप टाक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अंकूश नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोपिचंद आव्हाड व दामोदर नागरे यांच्यावर आज गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.