पिंपरी : संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी | पुढारी

पिंपरी : संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  नवीन वर्षातील पहिला सण संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग दिसून येत होती. संक्रांतीसाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजरपेठेही फुलून  गेली आहे. संक्रांत म्हटले की, पूजेसाठी सुगड तसेच ऊस, हरबरा, बोरे, हळदी कुंकू, तिळगूळ, गव्हाच्या ओंब्या, विड्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवण्यात आली आहेत.  तसेच भोगीच्या भाजीकरिता मंडईमध्ये पावटा, हरबरा, शेंगदाणे, तीळ, वाटाण्याच्या व तुरीच्या शेंगा या मालाची मोठी आवक झाली आहे.

महिला संक्रांतीसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीत व्यस्त झाल्या आहेत. तसेच संक्रांतीसाठी लागणारे काळ्या कपड्यांची व हलव्यांच्या दागिण्यांची खरेदी केली जात आहे. नववधूच नाही, तर हौशी महिला व मुलीदेखील काळ्या रंगाच्या साडीची संक्रांतीनिमित्त खरेदी करताना दिसून येत आहेत. बाजारपेठेतील कपड्यांच्या दुकानामध्ये काळ्या रंगातील साड्या, कुर्ते तसेच छोट्या मुलींसाठी काळ्या खणातील सुंदर असे फ्रॉकदेखील उपलब्ध आहेत. मुलांसाठी विविध आकारातील पतंग विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

Back to top button