भाजपची साथ सोडा, युती करू! : प्रकाश आंबेडकर | पुढारी

भाजपची साथ सोडा, युती करू! : प्रकाश आंबेडकर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यास त्यांच्याशी युती होऊ शकते, असे धक्कादायक विधान करीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी राजकीय गुगली टाकली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र असतानाच आंबेडकर यांनी हा नवा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शिवसेना संभ्रमात पडली आहे. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांनी शिंदे गटाशी युतीबाबत आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याशी भेटीगाठी होतच राहतील; पण प्रत्येक भेट राजकीयच असेल, असे नाही. शिंदे गटाने भाजपची साथ सोडली, तर राजकीय चर्चा होऊ शकते. शिवसेनेत असतानाही एकदा युतीची चर्चा झाली होती. तेव्हाही भाजप सोडा, तुमच्यासोबत येतो, असे आम्ही शिवसेनेला सांगितले होते.

ज्या पक्षांसोबत भाजपची युती आहे. त्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही, ही आमची भूमिका जगजाहीर आहे. कारण, आमचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत तात्त्विक भांडण आहे. आम्ही जी व्यवस्था नाकारली. तीच व्यवस्था संघाला आणायची आहे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत कधीच जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांची शिवसेना आता भाजपसोबत नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत युती करणार आहोत, हे निश्चित आहे. युतीची चर्चा झाली आहे; पण युती झाल्याचे कधी जाहीर करायचे हे शिवसेनेने ठरवायचे आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

शरद पवार ठाकरे यांना फसवतील

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनीच करायची आहे. वंचितसोबत आघाडी करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी मनापासून तयार नाहीत. शरद पवार नक्की वेगळाच विचार करीत असतील. त्यांना मी चांगलाच ओळखून आहे. माझ्याइतके त्यांना कोणीच ओळखत नाही. शरद पवार आणि दोन्ही काँग्रेस एक दिवस उद्धव ठाकरे यांना नक्कीच फसविणार, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Back to top button