पुणे : राज्यातील 666 सीबीएसई शाळांची होणार तपासणी | पुढारी

पुणे : राज्यातील 666 सीबीएसई शाळांची होणार तपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच, यू-डायस प्रणालीत माहिती न जुळणार्‍या राज्यातील 666 सीबीएसई शाळांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांची नावे आणि बनावट स्वाक्षर्‍यांचा वापर करून सीबीएसई शाळांना बनावट ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या संदर्भातील पुण्यातील तीन शाळांची चौकशी करण्यात आली. पुणे परिसरातील अन्य काही शाळांची ना-हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. शाळांना बनावट प्रमाणपत्र देणारी एक टोळी असल्याचे, तसेच बनावट प्रमाणपत्रांसाठी लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील 666 शाळांची माहिती यू-डायस प्रणालीतील माहितीशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांच्या मान्यतेसंदर्भातील कागदपत्रे तपासण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील सीबीएसई बोर्डाची मान्यता घेतलेल्या सर्वच शाळांची चौकशी करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत शाळांची मान्यतेसंदर्भात चौकशी करण्यात येईल.
                                      औदुंबर उकिरडे, उपसंचालक, पुणे विभाग

Back to top button