पुणे : नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार | पुढारी

पुणे : नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नायडू रुग्णालयाच्या परिसरात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. त्यासाठी नवीन इमारत आणि जुने वॉर्ड यांमधील जागेत असलेला ऑक्सिजन प्रकल्प हलवला जाणार आहे. याबाबत भवन रचना विभागाने आरोग्य विभागाला पत्र पाठवले आहे. जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना ऑक्सिजन प्रकल्प इतरत्र हलवला जाणार असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुग्णालयाच्या परिसरातच प्रकल्प स्थलांतरित केला जाणार असून, गरज भासल्यास तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू केला जाईल, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. नायडू रुग्णालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयोगशाळा व इतर सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्ण इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या दोन ब्रिटिशकालीन वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहेत. तिथे रुग्णांना सिलिंडरमार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

कोरोना महामारीच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णांवरील उपचारांमध्ये नायडू सांसर्गिक रुग्णालयाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाबाधितांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासल्याने मार्च-एप्रिल 2021 मध्ये नायडू रुग्णालयात दोन ऑक्सिजन निर्मिती टँक, एक रिफिलिंग स्टेशन आणि एक लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्यात आला.

नायडू रुग्णालयातील दोन्ही टँकची क्षमता दोन हजार लिटर प्रतिमिनीट एवढी आहे. दोन्हीसाठी जवळपास सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. राज्य शासनानेही दुसर्‍या लाटेदरम्यान तेरा टन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक दिला. मात्र, गरज न भासल्याने तो अद्याप बसविण्यात आलेला नाही.

वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू होणार असल्याने ऑक्सिजन प्रकल्प हलविण्यात येणार आहे. मात्र, तो जवळपासच स्थलांतरित करण्यात येणार आहे.

                        डॉ. संजीव वावरे, साहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

Back to top button