पुणे : तत्त्वांशी तडजोड न करता वाटचाल करावी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत | पुढारी

पुणे : तत्त्वांशी तडजोड न करता वाटचाल करावी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘एकविसाव्या शतकात भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीचे महत्त्व जगाला पटत आहे. बदलत्या सामाजिक जीवनाचा मागोवा घेत शाश्वत मूल्यांची कास धरून तत्त्वांशी तडजोड न करता वाटचाल केली पाहिजे,’ असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. प्रसाद प्रकाशनाचा अमृतमहोत्सवी सांगता समारंभ व प्रकाशन यानिमित्त रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. ब. देगलुरकर, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठाच्या संचालिका डॉ. उमा बोडस यावेळी उपस्थित होते.

प्रसाद प्रकाशनाच्या 13 पुस्तकांचे प्रकाशन आणि ऑनलाईन रेडिओचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. डॉ. भागवत पुढे म्हणाले, ‘ज्या अंतिम सुखाच्या शोधात मनुष्यप्राणी जागतिक स्तरावर जी धावपळ करीत आहे, त्याचे उत्तर विज्ञानालाही सापडलेले नाही. यासाठी अध्यात्मात, वेद-उपनिषदांमध्ये आतला शोध घेण्याची प्रक्रिया सांगितली आहे, त्याच्या मुळाशी सत्याचा आविष्कार आहे.’ मुनगंटीवार म्हणाले, ‘सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिल्या दहांमध्ये येतो; परंतु आता या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. ‘सोशल अ‍ॅनिमलपासून सेल्फीश अ‍ॅनिमल’ असा मनुष्यजातीचा प्रवास येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविणे आवश्यक आहे.’

भारतीय संस्कृती सर्वात प्राचीन…
‘विविध संस्कृतींचा अभ्यास केला असता, भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती असल्याचे आढळून येते. भारतीय संस्कृती ही नित्यनूतन अशी आहे. मूल्ये जोपासत असतानाच नवतेचा ध्यास घेणारी भारतीय संस्कृती आहे. अशा या संस्कृतीची समृद्धी व्हावी आणि भरभराट व्हावी,’ अशी अपेक्षा मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली.

Back to top button