Abhimanyu Easwaran : स्‍वत:च्‍या नावाने असणार्‍या स्‍टेडियमवर खेळण्‍यासाठी उतरला अभिमन्‍यू ईश्‍वरन, जाणून घ्‍या यामागील योगायोग | पुढारी

Abhimanyu Easwaran : स्‍वत:च्‍या नावाने असणार्‍या स्‍टेडियमवर खेळण्‍यासाठी उतरला अभिमन्‍यू ईश्‍वरन, जाणून घ्‍या यामागील योगायोग

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटमध्‍ये दैदिप्‍यमान कामगिरी केलेल्‍या दिग्‍गज खेळाडूंच्‍या नावाने एखादे स्‍टेडियम असणे ही साहजिकच आहे. मात्र आपल्‍या खेळाची सुरुवातच स्‍वत:च्‍या नावाने असणार्‍या स्‍टेडियमवर करण्‍याचा योग तसा दुर्मिळच. असाच योग साधला आहे पश्‍चिम बंगाल रणजी संघातील फलंदाज अभिमन्‍यू ईश्‍वरन ( Abhimanyu Easwaran ) याने. असा योग साधणारा तो देशातील बहुदा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. जाणून घेवूया त्‍याने हा योग कसा साधला याविषयी….

पश्‍चिम बंगालचा युवा फलंदाज अभिमन्‍यू ईश्‍वरन आज ( दि. ३) रणजी ट्रॉफीमधील उत्तराखंड विरुद्धच्‍या सामन्‍यात डेहराडूनच्‍या मैदानात खेळण्‍यासाठी उतरला. विशेष म्‍हणजे, हे स्‍टेडियमच त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या नावाने आहे. योगायोग असा की, ६ डिसेंबर १९९५ रोजी जन्‍मलेल्‍या अभिमन्‍यूचे वडील रंगनाथन परमेश्‍वरन ईश्‍वरन यांनी मुलाच्या नावाने २००५ मध्ये स्‍टेडियमची उभारणी सुरु केली होती . आज स्‍वत:च्‍या नावाने असणार्‍या स्‍टेडियमवर प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळण्‍याचा योग अभिमन्‍यू याने साधला आहे.

२७ वर्षीय अभिमन्‍यू याने आपल्‍या वडिलांनी डेहराडूनमध्‍ये उभारलेल्‍या ॲकडमीमध्‍येच क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. त्‍याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्‍ये ७९ सामने खेळले असून, यामध्‍ये १९ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. सरासरी ४६.३३ ने त्‍याने ५ हजार ७४६ धावा केल्‍या आहेत. तो बंगाल रणजी संघाचा कर्णधार आहे. नुकतेच बांगलादेश विरुद्धच्‍या कसोटी सामन्‍यात संघात समावेश करण्‍यात आला होता. मात्र दोन सामन्‍यांच्‍या मालिकेत त्‍याला संघात
खेळण्‍याची संधी मिळाली नव्‍हती.

Abhimanyu Easwaran : वडिलांनी १९८८ मध्‍ये स्‍थापन केली क्रिकेट ॲकडमी

अभिमन्‍युचे वडील रंगनाथन परमेश्‍वरन ईश्‍वरन हे व्‍यवसायाने चार्टडे अकाउंटंट आहेत. क्रिकेटप्रेमी असणार्‍या रंगनाथन यांनी त्‍यांनी आपल्‍या मुलाच्‍या जन्‍मापूर्वीच १९८८ मध्‍ये डेहराडूनमध्‍ये अभिमन्‍यू क्रिकेट अकादमी सुरु केली होती. या
स्‍टेडियमबाबत बोलताना अभिमन्‍यू म्‍हणाला की, याच मैदानावर मी क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. येथेच मी कठोर परिश्रम घेतले आहेत. याच मैदानावर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे हे माझ्‍यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्या वडिलांनी जिद्द आणि मेहनतीने हे स्टेडियम बांधले. याच मैदानात मला प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सामना खेळण्‍याची संधी मिळाली हा एक सुवर्ण योगच आहे. माझ्या वडिलांच्या मेहनतीमुळे मला ही संधी मिळाली आहे.

सारे काही क्रिकेटवरील प्रेमापोटी…

रंगनाथन परमेश्‍वरन ईश्‍वरन म्‍हणाले की, मी अत्‍यंत खडतर परिस्‍थितीत माझे शिक्षण पूर्ण केले. मी आईस्‍क्रीम विकत शिकलो. सीए होत असताना मी वृत्तपत्र विक्रेताही होतो. क्रिकेट खेळाला मी पूर्णपणे समर्पित राहिलो आहे. माझ्‍या मुलाच्‍या जन्‍माच्‍या सात वर्षांपूर्वी मी डेहराडूनमध्‍ये अभिमन्‍यू क्रिकेट ॲकडमी सुरु केली. यानंतर २००५ मध्‍ये जमीन खरेदी केली आणि २००६ मध्‍ये स्‍टेडियमचे बांधकाम सुरु केले. आज हे मैदान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय ) दत्तक घेतले असून, ते देशांतर्गत सामन्यांसाठी देण्यात आले आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

माझ्‍या मुलाने भारतासाठी १०० कसोटी सामने खेळावेत…

आपल्‍या मुलांच्‍या कामगिरीविषयी बोलताना रंगनाथन परमेश्‍वरन ईश्‍वरन म्‍हणाले की, “माझा मुलगा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्‍ये खेळत आहे;पण माझा मुलगा भारतासाठी १०० कसोटी सामने खेळले तेव्‍हा ती मोठी कामगिरी होईल. मी हे
स्‍टेडियम केवळ माझ्‍या मुलासाठी बांधलेले नाही. क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी मी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. आमच्‍या प्रशिक्षण ॲकडमीने विविध राज्‍यातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. आज हे खेळाडू केनिया आणि कुवेतसाठीही खेळत आहे”.

हेही वाचा :

 

Back to top button