Lowest score in T20 Cricket history | निचांकी धावसंख्या! टी-२० मध्ये नवल घडलं; १५ धावांत 'हा' संघ ऑलआऊट | पुढारी

Lowest score in T20 Cricket history | निचांकी धावसंख्या! टी-२० मध्ये नवल घडलं; १५ धावांत 'हा' संघ ऑलआऊट

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश स्पर्धेत शुक्रवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. सिडनी थंडर्स (Sydney Thunder) आणि एडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) यांच्यातला सामना टी-20 क्रिकेटच्या विक्रमात एका वेगळ्या विक्रमाने नोंदवला गेला. पीटर सिडलच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या एडिलेड स्ट्रायकर संघाने 9 बाद 139 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ 15 धावांत तंबूत परतला. टी-20 क्रिकेटमधील ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. 2019 मध्ये टर्कीचा संघ झेक प्रजासत्ताकविरुद्ध 21 धावांवर तंबूत परतला होता. (Lowest score in T20 Cricket history)

प्रथम फलंदाजीला आलेल्या एडिलेड स्ट्रायकर्सकडून ख्रिस लीन (36) व कॉलिन डी. ग्रँडहोम (33) यांनी चांगली फलंदाजी केली. अ‍ॅलेक्स हेल्स, रिली रोसोवू असे तगडे खेळाडू असताना सिडनी थंडर्स हा सामना सहज जिंकतील असे वाटले होते; पण त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाच फलंदाज भोपळ्यावर बाद झाले; तर 3 अतिरिक्त धावा त्यांना मिळाल्या. तरीही त्यांचा संपूर्ण संघ 5.5 षटकांत 15 धावांत तंबूत परतला. हेन्री थॉर्टनने 2.5 षटकांत 3 धावांत 5 फलंदाज बाद केले. वेस अ‍ॅगरने 6 धावांत 4 विकेटस् घेतल्या, तर मॅथ्यू शॉर्टने एक विकेट घेतली.

पुरुषांच्या T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वेळात संपलेला हा डाव आहे. एडिलेडने हा सामना 124 धावांनी जिंकला. बिग बॅश लीग ही ऑस्ट्रेलियातील T20 देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असून यंदाचा हा स्पर्धेचा 12 वा हंगाम आहे. (Lowest score in T20 Cricket history)

हे ही वाचा :

Back to top button