Women’s Cricket : पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत | पुढारी

Women's Cricket : पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत

मुंबई; वृत्तसंस्था :  ऑस्ट्रेलियाने भारताचा पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात 54 धावांनी पराभव करत मालिका 4 – 1 अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 196 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव 142 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅश्लेघ गार्डनेरने नाबाद 66 तर ग्रेस हॅरिसने नाबाद 64 धावा चोपल्या. भारताकडून दीप्ी शर्माने सर्वाधिक 53 धावा केल्या.

तत्पूर्वी, मालिकेतील पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने भारत आज मैदानात उतरला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत कांगारूंची अवस्था 2 बाद 17 धावा अशी केली होती. मात्र, तालिहा मॅग्राथ आणि एलिस पेरीने डाव सावरत ऑस्ट्रेलियाला 7 व्या षटकात 55 धावांपर्यंत पोहोचवले. ही जमलेली जोडी शेफाली वर्माने मॅग्राथला 26 धावांवर बाद करत फोडली. त्यानंतर देविका वैद्यने पेरीला 18 धावांवर बाद करत दुसरी सेट बॅटर देखील बाद केली. मात्र यानंतर गार्डनेर आणि ग्रेस हॅरिसने भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करण्यास सुरुवात केली. या दोघींनी शेवटच्या 5 षटकांत तब्बल 67 धावा चोपल्या. गार्डनेरने 32 चेंडूंत नाबाद 66 धावा ठोकल्या. तर ग्रेस हॅरिसने 35 चेंडूंत नबाद 64 धावा करत ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 4 बाद 196 धावांपर्यंत पोहोचवले. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 129 धावांची नाबाद भागीदारी रचली.

Back to top button