बेल्हे : बनावट लग्नात फसले अनेक नवरदेव; इज्जतीचा पंचनामा नको म्हणून अळीमिळी गुपचिळी | पुढारी

बेल्हे : बनावट लग्नात फसले अनेक नवरदेव; इज्जतीचा पंचनामा नको म्हणून अळीमिळी गुपचिळी

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या आमिषाचे भुरळ घालून खोटे लग्न जमवून फसवणूक करणार्‍या टोळीचे काही मोहरे परिसरात सक्रिय झालेले आहेत. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत वरपक्षाकडील लोकांची फसवणूक होण्याच्या घटनेत आळेफाटा, बेल्हे परिसरात वाढ झालेली आहे. इज्जतीचा पंचनामा नको म्हणून ”तेरी भी चूप और मेरी भी चूप” असा पवित्रा नवरदेवाकडील मंडळी घेत असल्यामुळे हे दलाल पोलिस रडारवर येत नाहीत. अशा घटना परिसरात मोठ्या प्रमाणात घडल्या जात असल्यामुळे आळेफाटा पोलिसांनी या टोळीवर वक्रदृष्टी दाखविण्याची गरज आहे.

वरपक्षाकडील ज्या मुलांचे लग्न लवकर जमत नाही, त्यांनी काही वधूवर सूचक केंद्राकडे नावनोंदणी केलेली असते. वरपक्षाकडील मंडळी गावातील काही सोयरिक जमविणार्‍या लोकांकडे धाव घेऊन लग्न जमविण्यासाठी या मंडळींना पुढाकार घ्यायला लावतात. याद्वारेच नवरदेवाची थेट माहिती बनावट लग्न लावून देणार्‍या टोळीपर्यंत जाते आणि मग बनावट दलाल बरोबर अशा घरी येऊन धडकतात.
गोड बोलून मग हीच मंडळी स्वत:हून आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगून नवरदेवाच्या घरी सोयरिकीसाठी येतात. परिसरातील हे बनावट दलाल पैसे घेऊन मग औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीतील सक्रिय असलेल्या महिलांना हाताशी धरून नवरदेवाला मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम पार पाडतात, अशी या टोळीची कार्य करण्याची पद्धत आहे.

मुलगी पसंत पडली की, एखाद्या मंदिरात थाटमाट न करता लग्न उरकून घेतले जाते. मुलगी लग्नानंतर दोन-तीन दिवसांनी माहेरी जाण्याचा बहाणा करून निघून गेल्यानंतर पुन्हा माघारी येतच नाही मग नवरदेवाकडील लोक आपली फसवणूक झाल्यामुळे पोलिसांत जावे की नाही, या विवंचनेत असतात. मग नवरीसह तिच्या बनावट आई-बापांचेही मोबाईलही नॉट रिचेबल होतात. अशा फसवणुकीच्या एक ना अनेक घटना असून, अनेक नवरदेव बळीचे बकरे होताना दिसून येत आहेत. त्यामुळे या बनावट टोळीचा म्होरक्या मास्टर माईंड व टोळी सक्रिय असणार्‍यांचा छडा लावून नवरदेवाच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी हिसका दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे.

बदनामीपोटी गुन्हा दाखल नाही
मी एका दुकानात कामगार आहे. मी नशापानी करतो. अनेकांना हा माझा स्वभाव माहीत आहे. मला एखादी मुलगी बघा, असे अनेकांना मी सांगितले होते आणि याची वार्ता थेट बनावट लग्न लावून देणार्‍या टोळीपर्यंत गेली. माझे लग्न झाले, तीन दिवसांनी नवरी गेली तर परत माघारी आलीच नाही. मी अधिक चौकशी केली असता हा प्रकार करण्यात “त्या” पटाईत असल्याची माहिती मिळाली. इज्जतीचा पंचनामा नको म्हणून मी पोलिसांत जाण्याचे टाळल्याची कबुली फसवणूक झालेल्या नवरदेवाने दिली.

शेतकर्‍याचीही झाली आहे फसवणूक
मी एक शेतकरी असून, माझी पहिली बायको नांदत नसल्याने मला दुसरे लग्न करायचे होते. मी मित्रमंडळी नातेवाइकांच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते काही जमेना. औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या एका व्यक्तीने मला मुलगी दाखवली, पसंत पडली. माझे लग्न झाले, परंतु त्यानंतर ती माहेरी गेली ती परत आली नाही. माझ्याकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला पण उपयोग झाला नाही. मी बनविलेले सोन्याचे दागिने आणि घरातील रक्कम ती घेऊन गेली. माझी फसवणूक झाली. उगाच इज्जतीचा पंचनामा नको म्हणून मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली नाही.

वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली फसवणूक
वधू-वर सूचक केंद्र चालविण्यासाठी नोंदणी करून परवाना घेणे कायद्यात बंधनकारक आहे. मात्र, वधू-वर केंद्र सुरू करून कारभार पारदर्शी केला जात असला, तरी फसवणूक करणार्‍या टोळीतील काही चलाख आणि चाणाक्ष मोहरे या केंद्रातून नवरदेवाची माहिती घेऊन संपर्क साधून फसवणूक करत असल्याची चर्चा आहे.

 

Back to top button