नवीन वर्षात मुंबईकरांचा रोजचा प्रवास होणार आरामदायी, बेस्टच्या ताफ्यात येणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस | पुढारी

नवीन वर्षात मुंबईकरांचा रोजचा प्रवास होणार आरामदायी, बेस्टच्या ताफ्यात येणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस

 सुरेखा चोपडे : मुंबई – नवीन वर्षात मुंबईकरांचा बेस्ट आणि लोकलचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुकर होणार आहे. जास्तीत जास्त प्रवासी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बेस्‍टने आपल्या ताफ्यात ९०० डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय़ घेतला आहे. पहिल्या एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसचा लोकार्पण सोहळा ऑगस्ट २०२० मध्‍ये झाला होता. आता बेस्टच्या ताफ्यात मकर संक्रातीच्या मुहुर्तावर म्हणजेच १४ जानेवारीपर्यत ५० एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस येणार आहेत.

लोकल

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून उपनगरीय लोकलला ओळखले जाते.  सध्या मध्य रेल्वे मार्गावरुन अंदाजे ४० तर पश्चिम रेल्वे मार्गावरुन सुमारे २८ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील विविध रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येत आहे.  प्रवासी सुविधांमध्ये स्थानकात लिफ्ट आणि पादचारी पुलांवर भर देण्यात येणार आहे.

नेरुळ-उरण

उरणला मुंबईशी लोकलने जोडण्यात येत आहे. नेरुळ ते उरण प्रकल्पातील पहिला टप्पा नेरुळ ते खारकोपर मार्गावर लोकल सध्या धावत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या मार्गातील दुसरा टप्पा म्हणजेच खारकोपर ते उरण मार्गावर लोकल सुरु करण्यात येणार आहे. याचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  नेरूळ /बेलापूर ते उरण रेल्वे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. एकूण २७ किमी लांबीचा हा मार्ग असून यातील नेरूळ – बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला होता.

दिघा स्थानकाची भर

कळवा – ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पातील दिघा स्थानक नव्या वर्षात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हिसी) या प्रकल्पाचे काम करीत आहे. ऐरोली–कळवा एलिव्हेटेड मार्ग प्रकल्पातील दिघा स्थानक हा पहिला टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाचे काम रखडले. या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली. या स्थानकाच्या कामाला आधी मार्च २०२० पर्यंत आणि त्यानंतर मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती.

एकच कार्ड

प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी. तसेच तिकीट, पास काढताना सुट्यापैशांवरुन होणारा वाद आणि रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मदतीने एकच सामायिक कार्ड सेवा प्रवाशांकरिता सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने क्षेत्र सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार लवकरच याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कार्डच्या मदतीने बेस्ट,मेट्रो,लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

बेस्ट

मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्टने कोरोनाकाळात देखील मुंबईकरांना चोख सेवा दिली. सध्या बेस्टची प्रवासी संख्या ३५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. किफायतशीर तिकिटामुळे बेस्टने मुंबईकरांचा जास्त ओढा आहे.

डबल डेकर इलेक्ट्रिक बस

मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवासी आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बेस्टची डबलडेकर बस आहे. त्यामुळे बेस्टने जास्तीत जास्त प्रवासी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या ताफ्यात ९०० डबलडेकर एसी ईलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय़ घेतला आहे. पहिल्या एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा लोकार्पण सोहळा ऑगस्ट महिन्यात झाला होता.  आता बेस्टच्या ताफ्यात मकरसंक्रातीच्या मुहुर्तावर म्हणजेच १४ जानेवारी पर्यत ५० एसी डबलडेकर ईलेक्ट्रिक बस येणार आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात ४५ साध्या डबल डेकर बस आहेत. डबल डेकर बसची प्रवासी क्षमता जास्त आहे. नवीन डबलडेकर इलेक्ट्रिक बसची प्रवासी आसन क्षमता ७६ आहे. या बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, दोन वाहकांना एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी विशेष व्यवस्था, दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे आणि ते उघड-बंद करण्याचे नियंत्रण चालकाकडे असणार आहे. या बसचे चार्जिंग ८० मिनिटांत पूर्ण होते.

बेस्टची ॲपआधारित ई-वातानुकूलित टॅक्सी सेवा

मोबाइल ॲप आधारित ओला, उबरसह अन्य खासगी टॅक्सी कंपन्याशी स्पर्धा करण्यासाठी बेस्टने देखील मोबाइल ॲपआधारित ई-वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात जून २०२३ पर्यंत ५०० टॅक्सी दाखल होणार आहेत. या टॅक्सीवर बेस्टचा लोगो असणार आहे. वैयक्तीकरित्या प्रवासाबरोबरच शेअर टॅक्सी म्हणूनही त्या धावणार आहे. या टॅक्सीचे भाडे ओला-उबरच्या तुलनेत कमी असणार आहे.

स्मार्ट मीटरची जोडणी

वीज वितरण व्यवस्था सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यानुसार येत्या तीन महिन्यांत ही सेवा वीज ग्राहकांना उपलब्ध होणार असून त्यामुळे वीज वापराची अचूक माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी मोबाइल ॲपही वीज ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. एकुण १० लाख ८० हजार ग्राहकांना ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

एसटीची संख्या वाढणार

कोरोना आणि त्यानंतर कर्मचाऱ्यानी केलेल्या संपामुळे सध्या एसटी महामंडळाचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. प्रवासी संख्या घटल्याने त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यावर एसटी महामंडळ नविन वर्षात भर देणार आहे.त्यासाठी नविन बस ताफ्यात आणल्या जाणार आहेत.

आर्थिक तोटा कमी करण्यासाठी महामंडळाने गेल्या काही वर्षापासून नवीन बस खरेदी केलेल्या नाहीत. त्यातच ताफ्यातील एसटीचे आय़ुर्मान संपल्यामुळे बसची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटत आहे. परिणामी महामंडळाने नव्या वर्षात साध्या प्रकारातील सुमारे तीन हजार २०० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन हजार बसच्या सांगाड्याच्या खरेदीसाठी निविदा काढली आहे. या बसमध्ये विमानाप्रमाणे पुश बॅक आसन व्यवस्था असेल. या बस टप्याटप्याने डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. तर एक हजार २०० बसपैकी काही बसगाड्या ताफ्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

शिवाई बस येणार

प्रदुषण मुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी महामंडळाने ईलेक्ट्रिक शिवाई बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा १५० शिवाई महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्याने येणार असून पहिल्या टप्यात ५० बस, तर दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० बसपैकी दोन बस पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर धावत आहेत. मुंबई, ठाणे – पुणे मार्गावरही एकूण १०० शिवाई बस चालवण्याचे महामंडळाचे नियोजन आहे.

हेही वाचा : 

Back to top button