आर्थिक फसवणुकीचे आरोप वरूण सरदेसाईंनी फेटाळले, भाजप आमदाराने विधानसभेत केला होता आरोप | पुढारी

आर्थिक फसवणुकीचे आरोप वरूण सरदेसाईंनी फेटाळले, भाजप आमदाराने विधानसभेत केला होता आरोप

पुणे : नागपूर अधिवेशनामध्ये भाजप आमदाराकडून माझ्यावर आर्थिक फसवणुकीचे करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यांनी ज्या मुलांची नावे घेतली, ते मुले मला माहित नाहीत व मी त्यांना कधीही भेटलो नाही.  भारतीय जनता पक्षाकडून केवळ खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचे म्हणत युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाईंनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले.

शुक्रवार ३० डिसेंबर रोजी भाजप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन तरुण मुलांना नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. तसेच सरदेसाई यांच्याशी संबंधित असणाऱ्या संस्थेवरही त्यांनी आरोप केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर वरूण सरदेसाई यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपली बाजू त्यांनी सविस्तरपणे मांडली.

पुढे बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, मी २०२१ मध्ये हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड या संस्थेचा अध्यक्ष झालो. यानंतर आम्ही नागपूरमध्ये केवळ एकच कार्यक्रम घेतला. यात आर्थिक गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने असून ते निराधार आहेत.

यामध्ये नोकरी किंवा इतर कशाचाही संबंध येत नाही. आम्ही संस्था ही मदत आणि पुनर्वसनासाठी प्रशिक्षण देणारी स्वयंसेवी संस्था आहे. त्यामुळे आमचा आर्थिक उलाढालीशी कोणताही संबंधच येत नाही. माझी चौकशी करायची असल्यास सरकारने ती बिनधास्त करावी, पण आरोपांचे पुरावे द्यावे. केवळ माझी बदनामी करण्याचे प्रकार भाजपकडून सुरू आहेत.

Back to top button