नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या | पुढारी

नाशिक : आ. कोकोटे यांच्या प्रयत्नातून जि.प. च्या 31 शाळांना अध्ययनासाठी मिळणार हक्काच्या वर्गखोल्या

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्तीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून 2 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सुमारे 31 गावांतील विद्यार्थ्यांना आता हक्काच्या वर्गखोल्यांमध्ये अध्ययन करता येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी 5 टक्के निधी हा जिल्हा परिषद शाळांना राखीव ठेवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची दुर्दशा झाल्याने त्यांची दुरुस्ती करणे व आवश्यक तिथे नवीन वर्गखोल्या बांधकाम करणे गरजेचे होते. आमदार कोकाटे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभागाला तत्काळ गावनिहाय शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधकामाचे प्रस्ताव बनविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मतदारसंघात तालुक्यातील 6 गावांत नवीन 11 वर्गखोल्यांसाठी 1 कोटी 5 लक्ष 60 हजार रुपये तर 25 शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी या कामांना प्रशासकीय मंजुरी देताना 9 महिन्यांच्या आत संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागास केल्या आहेत. सदर कामे मंजूर झाल्याने संबंधित गावांतील ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या गावांत होणार कामे
जिल्हा परिषद शाळांच्या नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्यासाठी प्रत्येक खोलीनिहाय 9 लाख 60 हजार रुपये मंजूर झाले आहेत. एकूण 1 कोटी 5 लाखांतून रामपूर, धनगरवाडी, कारवाडी येथे प्रत्येकी एक, शहा येथे 2 तर इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर व भंडारदरावाडी येथे प्रत्येकी 3 वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. वर्गखोल्या दुरुस्तीसाठी उजनी, नरोडेवस्ती पाथरे, पिंपळे येथे प्रत्येकी 10 लाख, दुसंगवाडी येथे 8 लाख, कोळगाव माळ, खंबाळे येथे प्रत्येकी 7 लाख, खडांगळी, निमोणी मळा-वावी, वडांगळी, नरोडेवस्ती देवपूर, मेंढी, हिवरे या शाळांसाठी प्रत्येकी 5 लाख तर शिंदेवाडी, धनगरवाडी येथे 4 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, गोंदे येथे 8 वर्गखोल्या मंजुर असून 75 लाखांपेक्षा जास्त निधीचा प्रस्ताव असल्याने त्यासाठी जनरल बोर्ड मिटींगवर मान्यतेसाठी सादर केल्याने 4 ते 5 दिवसांत त्याला 76.8 लाख किमंतीला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.

हेही वाचा:

Back to top button