कोल्हापूर : विद्यार्थ्याला शिक्षा दिल्याने शिक्षकावर जीवघेणा हल्ला | पुढारी

कोल्हापूर : विद्यार्थ्याला शिक्षा दिल्याने शिक्षकावर जीवघेणा हल्ला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अभ्यासाकडे दुर्लक्ष केले म्हणून वर्गात अंगठे धरण्याची शिक्षा दिल्याने नववीतील विद्यार्थ्याच्या चुलत भावासह साथीदारांनी कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात संजय आनंदा सुतार (वय 45, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) हे ‘माझी शाळा’ या शाळेतील शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. कदमवाडी-भोसलेवाडी येथील भर चौकात सोमवारी दुपारी ही थरारक घटना घडली. शिक्षकाच्या गळ्यासह शरीरावर आठ ठिकाणी खोलवर वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

वर्मी हल्ल्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने सुतार यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिक, पालकांसह शिक्षकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळ, सुसंस्कार शिक्षण प्रसारक मंडळाची माझी शाळा व रुग्णालयात गर्दी केली होती. शाळेपासून हाकेच्या अंतरावर भर चौकात रक्ताचा सडा पडला होता.

पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शाहूुपुरीचे निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्ल्यानंतर मुख्य संशयितासह तीनही साथीदार पसार झाले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी सदर बाजार, विचारेमाळ, भोसलेवाडी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र त्यांचा सुगावा लागला नव्हता. मु्ख्य संशयिताच्या दोन मित्रांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शिक्षकांनी वर्गात दिलेल्या शिक्षेमुळे हा विद्यार्थी संतप्त झाला होता. त्याने चुलत भावासह त्याच्या मित्रांना हा प्रकार सांगितला. रविवारी (दि. 25) शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर सुतार यांच्यावर हल्ला करून शिक्षकालाच धडा शिकविण्याचा कट संबंधित विद्यार्थ्याने रचला.

Back to top button