नगर : पन्नाशीतील दाम्पत्याची सुवर्ण भरारी ; राज्यस्तरीय चॅम्पियन्स स्पर्धेत दोघांनाही सुवर्णपदके | पुढारी

नगर : पन्नाशीतील दाम्पत्याची सुवर्ण भरारी ; राज्यस्तरीय चॅम्पियन्स स्पर्धेत दोघांनाही सुवर्णपदके

सतीश रास्कर : 

जवळा : येथील शेतकरी ज्ञानदेव धोंडिबा पठारे (वय 55) व मीनाक्षी पठारे (वय 50) या दाम्पत्याने शिर्डी कोकमठाण येथे आत्मा मलिक या क्रीडा संकुलवर खेलो मास्टर्स राज्यस्तरीय चॅम्पियन्स स्पर्धेत झालेल्या विविध मैदानी खेळात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदके मिळविली. त्यामुळे जवळा परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. ज्ञानदेव पठारे यांना लहानपणापासून विविध खेळांची आवड. पण, लहानपणी त्यांना फिट येण्याचा आजार असल्याने ते खेळात भाग घेत नसत. पण, मैदानी खेळांविषयी त्यांचे प्रेम कधीच कमी झाले नाही. काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द ते मनात काय ठेऊन राहत होते. पुढे लग्न झाल्यावर त्यांना दोन मुली झाल्या. आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही, तर आपल्या मुलींना आपण प्रोत्साहन देऊ व आपले अधुरे स्वप्न पूर्ण करू, असे त्यांना वाटे.

त्यात एका मुलीने पोहण्याच्या स्पर्धेत राज्य स्तरपर्यंत यश मिळविले. परंतु, ते तरीही समाधानी नव्हते. छंद काही स्वस्थ बसू देत नव्हता.
लहानपणी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजार बरा झाल्यावर त्यांनी पुन्हा जिद्द बांधली आणि वयाच्या पन्नाशीनंतर पुन्हा जोमाने सुरवात केली. यात त्यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी त्यांना मोलाची साथ केली. त्याही त्यांच्याबरोबर चालत. कुठेही प्रशिक्षण केंद्रात न जाता घरच्या घरीच शेती व प्रपंच सांभाळून पोहणे व चालण्याचा सराव चालू ठेवला. कधी रांजणगाव गणपती (जि.पुणे), तर कधी टाकळी ढोकेश्वर येथे मागील वर्षी वयाच्या 54 व्या वर्षी 19 तासांत जवळा-आळेफाटा व पुन्हा आळेफाटा ते जवळा असा सुमारे 102 किमीचा न थांबता पायी चालण्याचा विक्रम आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविला.

त्यानंतर या वर्षी मागील आठवड्यात शिर्डी कोकमठाण येथे आत्मा मलिक या क्रीडा संकुलावर दि. 17 व 18 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय चॅम्पियन मैदानी स्पर्धेत त्यांनी 400 मीटर पोहणे, या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. दहा किमी धावणे व पाच किमी चालणे, या प्रकारातही सिल्व्हर पदक मिळविले. त्यांच्या पत्नी मीनाक्षी पठारे यांनीही भाग घेत पाच किमी चालणे या प्रकारात प्रथम येत सुवर्णपदक व 800 मीटर धावणे या प्रकारातही प्रथम येत सुवर्ण पदक मिळविले. आता त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली असल्याने पुढील सराव करण्याची तयारी त्यांनी चालू केली आहे. त्यांच्या या पन्नाशीतील जिद्द व उत्साहाची चर्चा जवळा परिसरात सुरू आहे.

 

आनंदी जीवन जगण्याची मजा मैदानी स्पर्धेत येते. जीवनात सातत्य व प्रबळ इच्छाशक्ती माणसाला यशप्राप्ती मिळवून देत असते. खेळातून समाधान व आनंद मिळतो. तो पैशात विकत घेता येत नाही.
                                                               -ज्ञानदेव पठारे, जवळा.

दोन्ही मुली रोहिणी आणि वृषाली यांच्या, आई तू नक्की यश मिळवू शकशील, या स्फूर्तीने क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातून हे यश संपादन करू शकले. -मीनाक्षी पठारे, जवळा.

Back to top button