Pune Porsche Car Accident | पुणे अपघात- पोर्शे कार १६० किमी प्रतितास वेगाने धडकली | पुढारी

Pune Porsche Car Accident | पुणे अपघात- पोर्शे कार १६० किमी प्रतितास वेगाने धडकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १७ वर्षाच्या बिल्डरच्या मुलाने पोर्शे टायकन ही लक्झरी सेडान कार भरधाव वेगाने चालवून (Pune Porsche Car Accident) दोन आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीचा बळी घेतला. या अपघाताच्या वेळी जेव्हा कार मोटारसायकलला धडकली तेव्हा कारचा वेग १६० किमी प्रतितास होता, असे वाहनाच्या पंचनाम्यातून उघड झाले आहे.

दरम्यान, येरवडा पोलिसांनी या अपघात प्रकरणी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला. पण अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर असलेले विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली. तसेच, अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाला दारू पिण्यास देणारा बार मालक आणि बार मॅनेजरलादेखील पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

कारच्या स्पीड लॉकने वेग दर्शविला

“पोर्शे टायकनच्या पंचनाम्यादरम्यान असे दिसून आले की जेव्हा कार मोटरसायकलला धडकली तेव्हा तिचा वेग १६० किमी प्रतितास होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कारच्या स्पीड लॉकने धडकेच्या वेळी शेवटचा वेग दर्शविला आहे,” असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

मुलगा अल्पवयीन, पोलिसांची याचिका फेटाळली

दरम्यान, रविवारी पुण्याच्या बाल न्याय मंडळाने काही अटींवर मुलाची सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच सदर मुलावर सज्ञान व्यक्ती म्हणून खटला चालवण्याची पोलिसांची याचिका बाल न्याय मंडळाने फेटाळली होती.

दारुचे व्यसन असल्याची दिली कबुली

अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळासमोर त्याला दारुचे व्यसन असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे गाडी चालवण्याची कोणतीही पात्रता नव्हती. तरीही तो गाडी चालवत होता, हे लक्षात घेता भरधाव वेगाने गाडी चालवणे एक भयंकर गुन्हा आहे.”

गुन्हा दाखल

पोलिसांनी अल्पवयीन मुलावर कलम ३०४-ए (बेदरकारपणे वाहन चालविणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने मृत्यू), २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३३७ आणि ३३८ (बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे कृत्य करुन मानवी जीवन धोक्यात आणणे अथवा इतरांच्या जीवास धोका निर्माण करणे) आणि भारतीय दंड संहितेचा ४२७ (दुखापत) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम ११९ (वाहतूक नियमांचे उल्लंघन) आणि १८४ (धोकादायकपणे वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पबमध्ये रात्री २ वाजेपर्यंत दारु प्याले

पोलिस आयुक्त अमितेश कुमार पुढे म्हणाले, “अल्पवयीन मुलगा त्याच्या चार मित्रांसह गेलेल्या दोन पबमधून आणि मुंढवा येथून अपघातस्थळी जाण्याच्या मार्गावरून आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात पुरेसे पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा मद्यपान करताना दिसत आहे. आम्ही आता त्याच्यावर मद्यपान करुन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुलगा आणि त्याचे मित्र रात्री १०.४० वाजता एका पबमध्ये गेले आणि तेथे त्यांना दारू देण्यात आली. पण, पबमध्ये दारू देण्यास नकार दिल्यानंतर ते १२.१० वाजता बाहेर पडले. ते तेथून जवळच्या एका पबमध्ये गेले जेथे ते घरी निघण्यापूर्वी पहाटे २ वाजेपर्यंत होते.”

रक्त नमुना चाचणी अहवालाची प्रतीक्षा

मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या चाचण्यांच्या अहवालाविषयी कुमार म्हणाले, “दोन स्वतंत्र चाचण्या घेण्यात आल्या. एक वैयक्तिक स्वरूप, वास आणि चालणे आणि दुसरी रक्ताच्या नमुन्याची होती. पण याची खात्री करण्यासाठी रक्त नमुना चाचण्या दोन वेगवेगळ्या सुविधांवर घेतल्या जात आहेत. आम्ही रक्त नमुना चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.”

हे ही वाचा :

 

Back to top button