अन्नधान्यांच्या साठवणुकीसाठी केंद्र सरकारचा पुढाकार | पुढारी

अन्नधान्यांच्या साठवणुकीसाठी केंद्र सरकारचा पुढाकार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अन्न पुरवठा तसेच वाढत्या किंमतीमुळे अनेक देशांमध्ये अन्न सुरक्षा संबंधी चिंता वाढवली आहे.अशात देशातील अन्नसुरक्षेला प्राधान्य देत केंद्रातील मोदी सरकारने विशेष पावले उचलली आहे. धान्य साठवणुकीसाठी असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे अन्नधान्यांची होणारी नासडी रोखण्यासाठी सरकारने खासगी गोदाम उभारण्यास प्रोत्साहन दिले आहे.

‘संपूआ’च्या काळात २००८ पासून सुरू झालेली ‘पीईजी’ या खासगी गोदाम बांधण्याच्या योजनेवर मोदी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेसच्या काळात थंडबसत्यात पडलेल्या या योजनेवर मोदी सरकारने वेगाने काम करीत अन्नसुरक्षा सुनिश्चित केली आहे,असा दावा खासदार हिना गावित यांनी ‘दैनिक पुढारी’ सोबत बोलताना केला. योजनेनुसार देशातील २२ राज्यांमध्ये एकूण मंजूर १५२.१५ लाख मॅट्रिक टन क्षमतेपैकी १४६.१० लाख मॅट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात आले असल्याचे गावित म्हणाल्या.

रेल्वे कनेक्टीव्हिटी असलेल्या ठिकाणावर धान्यांच्या साठवणुकीसाठी हब अँड स्पोक मॉडेलनूसार मोठमोठे ‘सायलोज’ उभारले जात आहे. देशातील २४९ ठिकाणी १११.१२५ लाख मॅट्रिक टन क्षमता असलेले हे सायलोज तीन टप्प्यांमध्ये उभारले जातील. योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील ८० ठिकाणांवर ३४.८७ लाख मॅट्रिक टन क्षमतेची गोदाम उभारली जातील. यातील १०.१२५ लाख मॅट्रिक टन क्षमतेचे १४ सायलोज डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) तत्वावर उभारण्यास तर, २४.७५ लाख मॅट्रिक टन क्षमता असलेले ६६ सायलोज डीबीएफओओ तत्वावर उभारण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आल्याचे गावित म्हणाल्या.
सरकारच्या या निर्णयामुळे अन्नधान्याची साठवणूक क्षमतेचे सुलभिकरण होईल शिवाय नासाडीवर देखील आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या या प्रयत्नामुळे वाहतुकीमुळे अन्नधान्यांचा होणारे नुकसान ०.२४ टक्क्यांवर आला आहे.
.हेही वाचा 

Back to top button