चीनी आक्रमकतेला तोंड देण्यासाठी सीमेवर आतापर्यंतची सर्वात मोठी तैनाती : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर | पुढारी

चीनी आक्रमकतेला तोंड देण्यासाठी सीमेवर आतापर्यंतची सर्वात मोठी तैनाती : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चीनी आक्रमकतेला तोंड देण्यासाठी सीमेवर आतापर्यंतची सर्वात मोठी तैनाती करण्यात आली आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी इंडो-जपान परिषदेत बोलताना दिली. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे दहा दिवसांपूर्वी चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावर टीका चालवली होती. त्या टीकेला जयशंकर यांनी आता उत्तर दिले आहे.

प्रत्यक्ष सीमारेषेवर चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढवलेली आहे. त्यांच्या या आक्रमकतेचा मुकाबला करण्यासाठी भारताने सीमेवरील तैनाती वाढवली आहे. एकतर्फी सीमा बदलण्याचा चीनचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. चीनच्या मुद्यावर केंद्र सरकार गंभीर असून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दाव्यात काहीही अर्थ नाही, असे जयशंकर यांनी सांगितले.

सीमेवर तणाव असूनही चीनसोबत व्यापार वाढत आहे, असे विचारले असता जयशंकर म्हणाले की, 1990 साली जेव्हा मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली, तेव्हा एमएसएमई क्षेत्राकडे लक्ष दिले गेले नाही. ज्या ठिकाणी उद्योगांना पाठबळ द्यावयास हवे होते, ते दिले गेले नाही. अशा स्थितीत चीनचा मुकाबला करणे भारताला कठीण होत गेले. त्यावेळी सप्लाय चेनकडेही विशेष लक्ष देण्यात आले नाही. चीनहून जी काही आयात केली जात आहे, ती गेल्या तीस वर्षांची देणगी आहे. कॉंग्रेसने तीस वर्षांत जे काही केले, ते पाच ते दहा वर्षांत बदलले जाऊ शकत नाही. निर्मिती क्षेत्रात मोठी मजल मारायची असेल तर भारत जपानपासून बरेच काही शिकू शकतो.

हेही वाचा :

Back to top button