बेळगावात हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; सभागृहात स्वा. सावरकर यांचा फोटो लावण्यावरून वाद | पुढारी

बेळगावात हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; सभागृहात स्वा. सावरकर यांचा फोटो लावण्यावरून वाद

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यावरून सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा फोटो लावू नये, यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी गेटवरच धरणे आंदोलन सुरू केले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. दहा दिवस चालणार्‍या या अधिवेशनाची गेली दोन महिने प्रशासनाकडून तयारी सुरु होती. बेळगावमध्ये होणारे हे दहावे अधिवेशन आहे. शेतकर्‍यांकडून ऊस दर आणि हमी भाव यावरुन पुकारलेले आंदोलन, सीमाप्रश्नावर निर्माण झालेला तणाव, या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध परिसरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वांना कडक सुरक्षा व्यवस्थेतून आत सोडले जात आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मंत्री यांचे आज सकाऴी अगमन झाले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे कालच आगमन झाले आहे.

सुरुवातीला विधानसभेचे दिवंगत उपसभापती आनंद मामणी यांच्यासह दिवंगत व्यक्तींना दोन्ही सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करुन थोड्यावेळाने प्रत्यक्षात अधिवेशनाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. सुवर्णसौध परिसरात हेलीपॅडही तयार करण्यात आले असुन हेलीकॉफ्टरही तैनात करण्यात आले आहे. आज दुपारी मुख्यमंत्री बोम्मई अथणी येथे होणार्‍या विकास कामाच्या उद्धाटनासाठी हजेरी लावणार आहेत.

या अधिवेशनामध्ये सहा विधयके मांडली जाणार आहेत. यामध्ये कन्नड भाषा विकास, सीमाभागाच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करणे यांचा समावेश आहे. यासह दोन खासगी विधेयकेही मांडली जाणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या काळात आंदोलनासाठी विविध संस्था, समााजाच्या ६१ संघटनांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी सुवर्णसौध समोरील बस्तवाड, कोडुस्कोप येथील जागा निश्चीत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button