दहशतवादाविरोधात जगाला एकत्र करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले : अनुराग ठाकूर | पुढारी

दहशतवादाविरोधात जगाला एकत्र करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले : अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दहशतवादाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यात केंद्रातील मोदी सरकार यशस्वी ठरले असून वर्ष २०१४ पासून आतापर्यंत सहा हजार दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, असे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरोधात जगाला एकत्र करण्याचे काम केले असल्याची टिप्पणीही ठाकूर यांनी यावेळी केली.

दहशतवादाचा खातमा करण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली असल्याचे सांगून ठाकूर पुढे म्हणाले की, मागील आठ वर्षांच्या कालावधीत दहशतवादी घटनांमध्ये १६८ टक्क्यांनी घट झाली आहे तर २०१४ नंतर सहा हजार दहशतवाद्यांनी शरणागती पत्करलेली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांत दहशतवादामुळे होणाऱ्या निरपराध लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले आहे. सामाजिक कल्याणाचा देखावा करीत दहशतवादाचा फैलाव करणाऱ्या पीएफआय संघटनेवर सरकारने बंदी घातली आहे. या संघटनेबरोबरच इतर कट्टरवादी संघटनाविरोधात सरकारची कारवाई यापुढेही चालूच राहील. असेही ठाकूर म्हणाले.

दहशतवादाविरोधात मोदी सरकार शून्य सहिष्णूतेच्या भावनेने काम करीत असून सरकारच्या निर्णायक कारवाईने अनेक ठोस परिणाम दिलेले आहेत. त्यात २०१६ सालचे सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ साली बालाकोटवर करण्यात आलेल्या कारवाईचा समावेश आहे. नक्षलवादी घटनांमध्ये मागील काही काळात २६५ टक्क्याने घट झाली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारने राबविलेल्या ऑपरेशन गंगाची माहिती ठाकूर यांनी दिली. वर्ष २०२१-२२ मध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या २२ हजार ५०० भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले. फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिने हे अभियान चालले होेते. वर्ष २०२१ मध्ये ऑपरेशन शक्ती राबविण्यात आले. याअंतर्गत अफगाणिस्तानातून ६७० लोकांना भारतात आणले गेले. कोरोना संकटकाळात वंदे भारत योजनेच्या माध्यमातून जगाच्या विविध भागात अडकलेल्या १ कोटी ८३ लाख लोकांना मायदेशी परत आणले गेले.

      हेही वाचलंत का ?

Back to top button