Share Market Updates | शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, IT शेअर्संना फटका | पुढारी

Share Market Updates | शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, IT शेअर्संना फटका

Share Market Updates : अमेरिकेची प्रमुख मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. याचे पडसाद आज गुरुवारी (दि.१५) आशियाई शेअर बाजारात उमटले. आशियाई बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात घसरण पहायला मिळाली. तसेच भारतीय शेअर बाजारातही हीच स्थिती राहिली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १०० हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास सेन्सेक्स ५०० अंकांहून अधिक घसरून ६२,१०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी १८,५०० वर व्यवहार करत आहे.

फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आणखी वाढ करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर माहिती तंत्रज्ञान शेअर्संना मोठा फटका बसला. आयटी शेअर्स घसरले. प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तो सुमारे १ टक्क्याने खाली आला. आयटी निर्देशांकातील सर्व दहा विभागात घसरण पहायला मिळाली. दरम्यान, बँक निफ्टी निर्देशांकाचा विक्रमी उच्चांक गाठण्याचा दोन दिवसांचा सिलसिला थांबला. तो ४४ हजारांच्या खाली म्हणजेच ४३,९०० वर आला आहे.

IRCTC चे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स गुरुवारच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर हा शेअर ५.१७ टक्क्यांनी घसरून ६९६.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयानंतर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक घसरले. डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक हे निर्देशांक अनुक्रमे ०.४ टक्क्याने आणि ०.७ टक्क्याने घसरले. तर आशियातील बाजारांवर नजर टाकली तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी घसरला तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १.७४ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट इंडेक्स ०.४६ टक्क्यांनी खाली आहे तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.४ टक्क्यांनी खाली येऊन व्यवहार करत आहे.

महागाईने हैराण झालेल्या अमेरिकेतील जनतेला दिलासा देण्यासाठी फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे आणि आणखी दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. या व्याजदरवाढीमुळे या बँकेच्या व्याजदराची श्रेणी ४.२५ टक्क्यांवरून ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर १५ वर्षातील सर्वाधिक आहे. फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले आहे की, दरवाढीच्या एकत्रित परिणामाला अर्थव्यवस्था कसा प्रतिसाद देत आहे हे पाहण्यासाठी बँकेला दरवाढीची गती कमी करायची होती. (Share Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button