Narsimha Jayanti 2024 | श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर देशाचे दक्षिण प्रयाग!, श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर धार्मिक ऐतिहासिक ठेवा

श्री लक्ष्मी-नृसिंह
श्री लक्ष्मी-नृसिंह

[author title="राजेंद्र कवडे-देशमुख" image="http://"][/author]

बावडा; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील निरा व भीमा या नद्यांच्या समावर्ती वसलेल्या प्रसिद्ध श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये सध्या श्री नृसिंह जयंती (Narsimha Jayanti 2024) नवरात्र उत्सव सोमवार (दि.13) पासून सुरू असून, श्री नृसिंह जयंतीचा सोहळा वैशाख शुद्ध त्रयोदशीला मंगळवार (दि. 21 मे) रोजी संपन्न झाला. या नवरात्र उत्सवाची सांगता गुरुवार दि. 23 रोजी होणार आहे. सध्या मंदिरामध्ये सुरु असलेल्या श्री नृसिंह जयंती नवरात्र उत्सवामुळे श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजून गेले आहे.

इंदापूर तालुक्यातील प्राचीनकालीन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर हे पुणे जिल्ह्याचे आग्नेय दिशेचे शेवटचे टोक आहे. पुणे शहरापासून 165 कि.मी. तर अंतरावर असलेले श्रीलक्ष्मी-नृसिंहाचे मंदिर हे निरा व भीमा या नद्यांच्या संगमावरती वसलेले असून, ऐतिहासिक, पौराणिक असे महत्वाचे धार्मिक स्थान आहे. या मंदिरास वेदकालापासून उज्वल इतिहास लाभला आहे. मंदिरातील विष्णू रूप असलेली वालुकामय नृसिंह मूर्ती अतिशय प्राचीन आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर श्रीनृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य याच ठिकाणी असल्याची अख्यायिका आहे. भक्त प्रल्हाद अनन्यसाधारण भक्तिभावाने नृसिंहांच्या 'वालुकामय मूर्तीची' पूजा करीत असत, हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती सध्या गाभाऱ्यामध्ये आहे.  संत श्री तुकाराम महाराजांनी या तीर्थक्षेत्राला दक्षिण प्रयाग असे नाव दिले आहे.

" उमा रमा एक सरी! वाराणसी ते पंढरी!

गया तेची गोपाळपूर! प्रयाग निरा नरसिंहपुर!" पंढरपूरच्या नित्य वारा करणारे तुकाराम महाराज या ठिकाणी सतत येत असत. भारतातील श्री नृसिंहाच्या प्रमुख प्राचीन पिठांपैकी श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर हे एक प्रमुख स्थान आहे. भारतातील अनेकांचे हे कुलदैवत आहे. श्रीलक्ष्मी-नृसिंह मंदिराचे बांधकाम सुमारे 450 वर्षांपूर्वीचे जुने आहे. विठ्ठल शिवदास दाणी ( विंचुरकर सरदार ) यांनी मंदिर व निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला अंडाकृती प्रचंड असा घाट शके 1527 मध्ये बांधला. पुढे शके 1787 साली त्यांच्या पाचव्या पिढीचे सरदार रघुनाथ दाणी (विंचुरकर) यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्यासंबंधीचा शिलालेख मंदिरात उपलब्ध आहे.

इतिहासकाळात संत ज्ञानेश्वर, एकनाथ रामदास व तुकाराम यांच्या लेखनात नृसिंह कथेचा उल्लेख आढळून येतो. श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर उतुंग व भव्य असून पेशवे काळातील वास्तुशिलाचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी रुंद व भक्कम तट आहेत. श्री मूर्तीचा प्रमुख गाभारा, त्या पुढील गर्भागार, रंगशिलेचा सभामंडपाचे संपूर्ण दगडी बांधकाम असून दगडी छतावरील नक्षी व विविध देवाच्या मूर्ती लक्षणीय आहेत. घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक आहे. पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. रंगशिला मंडपाचे दोन्ही बाजूस तीन दरवाजे आहेत. श्रीनृसिंहाचे डाव्या बाजूस श्रीलक्ष्मीचे मंदिर आहे. श्रीलक्ष्मीची रेखीव व सुंदर मूर्ती शिळेची असून उभी आहे. पूजा बांधल्यावर बसल्यासारखी दिसते.

श्रीनृसिंहाच्या समोर लाकडी सभामंडपात भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. हात जोडून उभी राहिलेली ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. नृसिंह मूर्ती व प्रल्हाद मूर्ती एकमेकांच्या समोर असून नृसिंह मूर्तीच्या पायांच्या समपातळीस या मूर्तीचे मस्तक येते हे एक विशेष आहे. मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरे व मुर्त्या आहेत. तसेच नीरा नदीकाठी व भीमा नदीकाठी अनेक देव देवतांची मंदिरे आहेत.

घंटा 

मंदिराच्या पश्चिम दरवाज्याकडे प्रल्हाद मंदिराच्या पाठीमागे वाजविण्याची प्रचंड घंटा बांधलेली आहे. इ.स.1739 साली पुण्याचे पेशवे चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर त्या लुटून पुण्यास आणल्या. श्रीमंत पेशवे यांनी या घंटा निरनिराळ्या देवस्थानाला पाठवून दिल्या. त्यापैकीच एक निरा नरसिंहपूर येथे आणण्यात आली आहे.

नीरा-भीमा संगम घाट

नीरा भीमा या नद्याच्या संगमावरती घाटामध्ये शिल्प सौंदर्य लक्षणीय आहे. घाटाच्या पायऱ्यात बसविलेल्या मोठ्या दगडातून हत्तीचे शिल्प घडविले आहेत. हत्ती व सिंह यांची जोडी लक्षवेधी आहे. शिवाय मगरीचे पाच शिल्प आहेत. मंदिराच्या पुढच्या बाजूस दीपमाळ व जानकेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. सती पत्नी जानकीबाई यांच्या स्मरणार्थ रघुनाथ विंचूरकर यांनी शके 1803 साली हे शिवमंदिर बांधले.

विधी : नागबली , त्रिपिंडी (पिंडदान), कालसर्प योगशांती, ग्रहशांती, नक्षत्र शांती या सारखे विधी या तीर्थक्षेत्री केले जातात. त्यामुळे सर्व दोष नाहीसे होतात, असे सांगितले जाते.

ऐतिहासिक क्षेत्राचे महत्त्व ओळखून शासनाने सन 2001 मध्ये या क्षेत्रास राज्य संरक्षिहत स्मारक म्हणून घोषीत केले आहे.
श्री'चे होणारे नित्य पूजा विधी व उपचार :

काकड आरती : पहाटे 5 वा. सूर्योदयापूर्वी पूजाधिकारी देवालयाची द्वारे उघडून श्री'सह सर्व परिवार देवतांना काकड्याने ओवाळतात. यावेळेस श्रींस खिचडीचा नैवैद्य दाखविला जातो.

प्रातःपूजा : सकाळी 7 वा. पहिल्या प्रहरात पूजा पूर्ण होते. श्री नृसिंह व श्री शामराज या दोन्ही मूर्तीस पंचामृत स्नान घालून पूजा होते. नरसिंहपूर प्रथेनुसार ऋग्वेदीय व सामवेदीय सुक्तांनी तसेच पौराणिक मंत्रांनी पूजा केली जाते. नंतर श्री मूर्तीस पोशाख परिधान केला जातो. धूप दीपाने आरती होऊन श्रीस नैवैद्य दाखविला जातो. नंतर परिवार देवतांची पूजा केली जातो.

मध्यान्हपूजा :  दुपारी 12 वा.श्रींस पुरणपोळीचा महानैवैद्य दाखविला जातो व महाआरती केली जाते.

सायंपूजा :  सायंकाळी 7 वा.श्रींस पंचोपचारे मंत्र स्नान घालून धूप दीप नैवैद्य युक्त पूजा केली जाते. या वेळी नगार खाण्यातील नगारा नौबत, झांज, घाटी वाजवली जाते.

शेजारती : रात्रौ 9 वा. श्रींची शेजारती केली जाते. शेजारती नंतर प्रार्थना होऊन श्रींस दुधाचा नैवैद्य दाखविला जातो.

पूजा विधी :

नीरा-नरसिंहपूर येथे आल्यानंतर श्रींना कुलधर्म कुलाचार करता येतो. यामध्ये प्रकार पुढीलप्रमाणे :

1) महापूजा, महावस्त्र सेवा ( पवमान पंचसुक्त दुग्ध अभिषेक , महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार ) 2) पंचामृत अभिषेक  ( अभिषेक, महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार ), 3) पाद्यपूजा अभिषेक (पुरुषसुक्त अभिषेक), 4) चरण पूजा, 5) नंदादीप सेवा (अखंड/वार्षिक/मासिक/साप्ताहिक), 6) वसंत पूजा, 7) कुंकुमार्चन, 8) महानैवैद्य, कुलधर्म कुलाचार, 9) अलंकार पूजा, 10)  महालक्ष्मीस साडी व ओटी अर्पण.
1.श्रींची महावस्त्रे: धोतर/ सोवळे, शाल / उपरणे, बाराबंदी (अंगरखा), पुणेरी पगडी
2.महालक्ष्मीची महावस्त्रे: नऊवारी साडी व खण/पीस

आश्विन : अश्विन शु.१ ते अश्विन शु.९ नवरात्र उत्सव मंदिरामध्ये साजरा केला जातो. तर दसऱ्याच्या दिवशी श्रींस व महालक्ष्मीस महाअभिषेक, महावस्त्र पूजा अर्पण करण्यात येते. सायंकाळी सीमोल्लंघणासाठी श्रींची पालखी निघते. गावाच्या वेशीवर जाऊन आपटा पूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.

तसेच गरुड महोत्सव साजरा केला जातो. शिवाय संक्रातीला हजारोंच्या संख्येने महिला मंदिरामध्ये ओवासण्यासाठी गर्दी करतात. या मंदिराचे विश्वस्त मंडळ व पुजारी मंडळ भाविकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर हे प्राचीन, रम्य, प्रेरक व जागृत दैवत आहे.

श्री क्षेत्र नरसिंहपूर पृथ्वीचा केंद्रबिंदू!

श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्राचा परिसर हा पृथ्वीचा केंद्रबिंदू (नाभी) समजला जातो. त्यास शास्त्रीय व ऐतिहासिक पुरावे आहेत. भीमा नदी काठी असलेल्या वांगी येथे काही वर्षांपूर्वी भारत सरकारच्या भूशास्त्रज्ञांनी अणुविद्युत केंद्र उभारण्यासाठी पाहणी केली होती.

श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूरचे रूपच पालटले!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्रीलक्ष्मी-नृसिंह देवस्थान हे कुलदैवत आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना रु.284 कोटीचा विकास आराखडा मंजूर केला. या आराखड्यातील बहुतेक विकास कामे पूर्णत्वास गेल्याने श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूरचे रूपच पालटले आहे. त्यामुळे अतिशय विलोभनीय असे तीर्थक्षेत्र दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news