

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कर्जाची रक्कम भरण्यास विलंब झाल्याने महिला स्वसाहाय्य संघाच्या प्रमुखाने पत्नी व मुलाला घरात कोंडले. त्यामुळे झालेल्या मानसिक तणावातून एका मजुराने विषप्राशन करून जीवन संपवल्याची घटना इस्लामपूरमध्ये (ता. हुक्केरी) सोमवारी (दि. २०) उघडकीस आली. राजू खोतगी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी संघाच्या प्रमुखावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, राजू यांनी गावातील एका महिला स्वसाहाय्य संघाकडून सहा महिन्यांसाठी दीड लाख रूपये कर्ज घेतले होते. त्यांनी तीन महिने कर्जाची व्यवस्थित परतफेड केली होती; पण त्यानंतरचे तीन महिने त्यांना ते भरता आले नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी संघाच्या प्रमुखाने राजू यांच्याकडे कर्जाची रक्कम परत देण्याची मागणी केली होती. राजू यांनी त्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, वेळ देण्यास नकार देऊन त्या महिलेने राजूच्या मुलाला तारण म्हणून आपल्या घरी ठेवून घेतले. सायंकाळ झाली तरी तिने मुलाला न सोडल्याने राजू आणि त्यांची पत्नी दुर्गव्वा तिच्या घरी गेले. त्यावेळी मुलगा बसवराजला सोडून राजू व त्यांच्या पत्नीला तिने कोंडून घातले.
दुसरे दिवशी रविवारी (दि. १९) राजू यांना सोडून देऊन त्यांची पत्नी आणि मुलाला कोंडून ठेवले. घरी गेल्यानंतर या घटनेचा मानसिक त्रास करुन घेत राजू यांनी विषप्राशन केले होते. त्यांना यमकनमर्डीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस महिला संघाची प्रमुख जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली. काही संघटनांनीही याबाबत आंदोलन केले. त्यामुळे, याप्रकरणी महिला संघाच्या प्रमुखाविरोधात यमकनमर्डी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
कर्जाच्या रकमेसाठी कर्जदाराची पत्नी आणि मुलाला घरी कोंडून ठेवल्याने मजुराने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या यमकनमर्डी पोलिसांवरही कारवाई केली जाईल.
– बी. एस. न्यामगौडा, प्रभारी जिल्हा पोलिसप्रमुख
हेही वाचा :